हिंदूंना ठार मारण्याची धमकी देणार्‍या वाजिद सईदच्या विरोधात सनातन संस्थेच्या वतीने पोलिसांत तक्रार

सनातन आश्रम आणि साधक यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र !

 

 

फोंडा, २७ ऑगस्ट (वार्ता.) – एका ई-मेलद्वारे साधकांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या आणि जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वाजिद सईद याच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाणे आणि रायबंदर येथील सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की,

१. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना ठार मारण्याचा कट रचणे आणि राजस्थानमधील कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा शिरच्छेद करणे, या पार्श्वभूमीवर ही धमकी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

२. ही एक स्पष्ट धमकीच आहे. सनातन आश्रम आणि तेथे रहाणारे साधक यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचले जाऊ शकते. असा भयंकर कट रचणार्‍यांना शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेने अशा प्रकारे ई-मेलद्वारे पत्र पाठवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

३. ही केवळ हिंसाचाराची धमकी नाही, तर या ई-मेलमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी वाजिद सईद याच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.

४. या षड्यंत्राचे अन्वेषण करण्यात यावे आणि आरोपी दोषी आढळल्यास बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आरोपीच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी. ‘या ई-मेलकडे डोळेझाक करू नये’, ही विनंती या तक्रारीतून करण्यात आली आहे.