‘ईश्वराचे आठवे अंग, म्हणजे त्याचा भक्त’ हे समजल्यानंतर साधकाचे मन समाधानी होणे

‘सध्या माझ्या मनात घडत असलेली विचारप्रक्रिया हे एक प्रकारे अनेक वर्षांत अनुभवलेल्या सर्व प्रकारच्या घडामोडींचे फलित आहे. त्याविषयी सर्व काही येथे मांडणे शक्य नाही; म्हणून ते थोडक्यात मांडत आहे.

१. सामान्य साधक करत असलेल्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांसह मधून मधून ‘अद्वैत दर्शना’च्या संदर्भातील ग्रंथांचे वाचन करणे आणि त्यामुळे मनातील विचार न्यून होऊन मन प्रसन्न होणे

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

गेल्या काही वर्षांत ‘सामान्य साधक करत असलेल्या अन्य प्रकारच्या (व्यष्टी साधनेच्या) प्रयत्नांसह मधून मधून ‘अद्वैतदर्शना’च्या संदर्भातील ग्रंथवाचनाचा सत्संग आणि त्यानुरूप दैनंदिन साधनेकडे पहाणे’, हा मी राबवत असलेल्या प्रक्रियेचा गाभा आहे. त्यामध्ये मला जमेल, तेव्हा रात्री २० – २५ मिनिटे मी वाचन सत्संग करतो. वाचन चालू असतांना आणि झाल्यावर माझे मन दिवसभरात झालेल्या दैनंदिन विचारांच्या जंजाळातून आपोआप बाहेर येते आणि शांत होते. माझ्या मनातील विचार जवळपास संपतात. त्या प्रसन्नतेमध्ये आणि त्यातील भावलेल्या सूत्रांसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करत मी झोपी जातो.

२. एखादा त्रासदायक किंवा बहिर्मुख करणारा विचार मनात आल्यावर आदल्या दिवशी स्मरणात राहिलेले सूत्र भावजागृतीसाठी अंगीकारले जाणे आणि परिणामी मन त्रासदायक विचारांतून आपोआप बाहेर येऊन अनुसंधानात रहाणे

बर्‍याचदा मला रात्री समजलेल्या सूत्रांपैकी बरीचशी सूत्रे माझे मन दुसर्‍या दिवशी विसरलेले असते. असे असले, तरी बर्‍याच वेळा आदल्या रात्रीच्या वाचनातील स्मरणात राहिलेले किंवा त्याच्या आधारे स्फुरलेले एखादे सूत्र ‘भावाचा प्रयत्न’ म्हणून माझे मन स्वतःहून अंगीकारते. त्यामुळे दिवसा अन्य एखादा त्रासदायक किंवा बहिर्मुख करणारा विचार माझ्या मनात आला, तर त्यातून मन लगेच आपोआप बाहेर येऊन स्वतःहून अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करते. त्या अनुसंधानातून अंतर्यामी होत असलेले पालट मला जाणवतात. या अवस्थेमध्ये मला प्रतिदिन दिसणारी माणसे आणि नित्य घडणारे प्रसंग वेगळे भासतात.

३. ‘ईश्वराच्या आठ अंगांमध्ये पंचमहाभूते अन् सूर्य आणि चंद्र ही दोन अंगे मिळून सात अंगे अंर्तभूत असून आठवे अंग, म्हणजे ते सर्व पहाणारा ‘भक्त’ होय, हे ऐकल्यानंतर मन प्रसन्न होणे

१५.२.२०२२ या दिवशी रात्री मी ‘आर्ष विद्या’चे (‘आर्ष विद्या गुरुकुलम्’ या वैदिक शिक्षण देणार्‍या संस्थेचे) स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ‘उपदेश सारम्’ या काव्यातील साधना सूत्रांचे विवरण सांगण्यार्‍या एका चित्रफीतीचा भाग अल्प काळ पाहिला. त्यात त्यांनी त्यांच्या गुरुकुलातील भक्तांना तेथे असलेल्या श्री दक्षिणामूर्तीच्या (शिवाच्या) मूर्तीकडे पहाण्यास सांगितले. सर्व जण मूर्तीकडे पाहू लागल्यावर त्यांनी तिच्याशी संबंधित मूर्तीविज्ञान स्पष्ट केले. ‘ते करतांना त्यांनी मूर्तीमध्ये पंचमहाभूते कशी दर्शवली आहेत ? सूर्य आणि चंद्र कुठे

आहेत ?’, हे दाखवले. नंतर त्यांनी उपस्थित असलेल्या भक्तांना विचारले, ‘‘ईश्वराची आठ अंगे (ॲस्पेक्ट्स), म्हणजे आठ पैलू आहेत. पंचमहाभूते, सूर्य आणि चंद्र मिळून सात होतात, तर आठवे अंग कोणते ?’’ कुणी उत्तर देत नाही, हे पाहून ते म्हणाले, ‘‘पहाणारा स्वत: आठवे अंग आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे, तर तो तुमच्यातही आहेच !’’ हे सूत्र ऐकून मला आतून अकस्मात् पुष्कळ आनंद झाला. माझे मन प्रसन्न झाले आणि मी त्याच समाधानात झोपी गेलो.

४. आश्रमातील चिकित्सालयात जातांना ‘जे समोर पहातो, ते ईश्वराचे रूप आणि स्वतःही त्याच रूपाचा एक घटक’, अशी अंतर्यामी जाणीव वाटून मन सहजच समाधानात रहाणे

दुसर्‍या दिवशी आश्रमातील चिकित्सालयात जातांना ‘जे समोर पहातो, ते ईश्वराचे रूप आणि मीही त्याच रूपाचा एक घटक’, अशी अंतर्यामी जाणीव वाटून मन आपसूक समाधानात राहिले. केवळ समोर असणार्‍या कार्यापुरते विचार मनात येत राहिले. अशी स्थिती सायंकाळी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलेपर्यंत राहिली. मी त्यांना हे सूत्र सांगितले.’

इति श्रीगुरुचणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य दुर्गेश शंकर सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक