अबकारी अनुज्ञप्ती वारसा हक्काने कुटुंबियांना मिळू शकत नाही ! – अधिवक्ता आयरीश रॉड्रीग्स यांचा युक्तीवाद

पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला

अधिवक्ता आयरीश रॉड्रीग्स

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी आसगाव येथील ‘सिली सोल्स बार अँड कॅफे’च्या अबकारी अनुज्ञप्तीविषयी केलेल्या तक्रारीवरून अबकारी आयुक्तांसमोर सुनावण्या चालू आहेत. ‘सिली सोल्स बार अँड कॅफे’च्या अबकारी अनुज्ञप्तीला अनुसरून गोवा अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर २२ ऑगस्ट या दिवशी दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तीवाद केला. ‘सिली सोल्स बार अँड कॅफे’ची अबकारी अनुज्ञप्ती अँथनी गामा यांच्या निधनानंतर वारसा हक्क या नात्याने गामा कुटुंबियांना प्राप्त झाल्याचा दावा गामा कुटुंबियांचे अधिवक्ता बॅनी नाझारेथ यांनी अबकारी आयुक्तांसमोर केला.

गामा कुटुंबियाचे अधिवक्ता बॅनी नाझारेथ यांचा दावा खोडून काढतांना अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स म्हणाले, ‘‘एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या नावावरील अबकारी अनुज्ञप्ती वारसा हक्क या नात्याने आपसूकच त्याच्या कुटुंबियाच्या नावे हस्तांतर केली जाऊ शकत नाही. अँथनी गामा यांचे १७ मे २०२१ या दिवशी निधन झालेले असतांनाही म्हापसा येथील अबकारी कार्यालयाने २९ जून २०२२ या दिवशी अँथनी गामा यांच्या नावाने अनधिकृतपणे अनुज्ञप्तीचे नूतनीकरण केले.’’

अबकारी आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकून यासंबंधी पुढील सुनावणी १२ सप्टेंबर या दिवशी ठेवली आहे. अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी २२ ऑगस्ट या दिवशी पुन्हा ‘सिली सोल्स बार अँड कॅफे’ प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्याची राज्यपालांकडे मागणी केली आहे.

अनुज्ञप्तीविना बार चालू असल्याविषयी अबकारी आयुक्तांनी अहवाल मागितला

‘सिली सोल्स बार अँड कॅफे’ अबकारी अनुज्ञप्तीविना कसे चालू आहे ?’ याविषयी अबकारी आयुक्तांनी बार्देश तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांकडे अहवाल मागितला आहे.