भूमी बळकावण्याच्या एका प्रकरणात केवळ ३४ दिवसांत भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया केली पूर्ण !

भूमी घोटाळ्यात गोव्यातील शासकीय अधिकार्‍यांच्या सहभागाचे आणखी एक उदाहरण !

(‘म्यूटेशन’ म्हणजे भूमी खरेदी केल्यावर १/१४ उतार्‍यावर मालकीहक्क निश्चित होण्याची प्रक्रिया)

पणजी, २१ ऑगस्ट (वार्ता.) – भूमी बळकावल्याच्या प्रकरणी प्रमुख संशयित रॉयसन रॉड्रिग्स याला विशेष अन्वेषण पथकाने कह्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. २० ऑगस्टला रॉयसन याने पथकाला दिलेल्या माहितीनुसार बार्देशच्या मामलेदारांचा सहभाग असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले, तर २१ ऑगस्टला एका प्रकरणात भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया अवघ्या ३४ दिवसांत पूर्ण केल्याची माहिती उघडकीस आली आहे. वास्तविक सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मास आणि आवश्यक ‘ना हरकत दाखले’ न मिळाल्यास बर्‍याच वेळा १ वर्षही लागते. महसूल खाते, पुरातत्व आणि पोलीस खाते यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या संगनमताशिवाय जलद गतीने भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य आहे.

भूमी बळकावल्याच्या एका प्रकरणात भूमीच्या ‘म्युटेशन’साठी ७ मार्च २०२२ या दिवशी अर्ज करण्यात आला होता आणि ११ एप्रिल २०२२ या दिवशी ही ‘म्युटेशन’ प्रक्रिया पूर्ण झाली. या ३४ दिवसांच्या कालावधीत भूमीशी संबंधित व्यक्तींना ‘नोटीस’ पाठवण्यात आली नाही किंवा याविषयी कोणतेही विज्ञापन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले नाही, तसेच अर्जावर संबंधितांचे निवासी पत्तेही देण्यात आले नव्हते, तरीही संबंधित भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही एक धक्कादायक घटना मानली जात आहे.

भूमी बळकावण्याच्या प्रकरणी यापूर्वी उघडकीस आलेल्या काम करण्याच्या विशेष पद्धती आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना

१. भूमी बळकावण्याच्या प्रकरणी यापूर्वी कह्यात घेतलेला आणि नंतर जामिनावर सुटका झालेला महंमद सोहील याने पुरातत्व खात्यातील काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने खात्यातील गोपनीय कागदपत्रे काढून त्याजागी बनावट कागदपत्रे घुसवली. पुरातत्व खात्यातील पोर्तुगीज भाषेत हाताने लिहिलेली पाने मूळ वहीतून फाडून त्याजागी बनावट कागदपत्रे जोडली. बनावट कागदपत्रे जुनी वाटावी म्हणून ती कॉफीमध्ये बुडवण्यात आली. ही बनावट कागदपत्रे असल्याची कुणाला थोडीशीही शंका येणार नाही, अशा पद्धतीने ठेवण्यात आली होती.

२. महंमद सोहील याच्याकडे गोव्यात कुठे वापरात नसलेली भूमी (‘प्लॉट’) आहे, याची माहिती पुरवणार्‍यांचा मोठा ताफा होता.

३. महंमद सोहील ‘गोवा लँड रिकॉर्ड’चा फॉर्म ३ आणि फॉर्म ९ यांद्वारेही माहिती गोळा करत होता.

४. आसगाव येथील एका प्रकरणात संशयित रॉयसन रॉड्रिग्स याची आई ब्रांका हिचा ३० जानेवारी २०२२ या दिवशी मृत्यू झाला. मयत ब्रांका हिची मार्च २०२२ मध्ये करण्यात आलेल्या ‘सेल डीड’वर (विक्री खतावर) बनावट स्वाक्षरी करण्यात आली.