देशात ख्रिस्त्यांवर आक्रमणे होतात, हीच माहिती खोटी ! – केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिपादन

देशात ख्रिस्त्यांवरील कथित आक्रमणे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – देशात ख्रिस्त्यांवर आक्रमण होत आहेत. ती रोखण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर केंद्र सरकारने त्याचे म्हणणे मांडले आहे. सरकारने म्हटले आहे, ‘या संदर्भात देण्यात आलेली माहिती खोटी आणि ठरावीक उद्देशाने मांडलेली आहे. यात केवळ अनुमान काढण्यात आले आहे.’ ‘नॅशनल सॉलिडेरिटी फोरम’, ‘द इवेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया’ आणि बेंगळुरू येथील आर्चबिशप (वरच्या श्रेणीत कार्यरत असलेले पाद्री) डॉ. पीटर मचाडो यांनी या संदर्भात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यावर आता २५ ऑगस्टला सुनावणी हेणार आहे.

सरकारने म्हटले आहे की, याचिकाकर्त्यांनी विविध दैनिकांतील बातम्या, ऑनलाईन माहिती आणि खासगी संस्था यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे ख्रिस्त्यांवर आक्रमणे होत असल्याचा दावा केला आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, ख्रिस्त्यांवर ‘ते ख्रिस्ती आहेत’, यामुळे आक्रमणे झालेलीच नाहीत. तसेच उल्लेख करण्यात आलेल्या अनेक घटना खोट्या आहेत. व्यक्तीगत स्तरावर घडलेल्या घटनांना धार्मिक रंग देण्यात आला आहे.