संभाजीनगर येथे कार्यक्रमात विलंबाने आल्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत यांच्यावर खासदार आणि आमदार यांची टीका !

डॉ. भागवत कराड

संभाजीनगर – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे राष्ट्रध्वजाच्या लोकार्पण कार्यक्रमाला १७ मिनिटे विलंबाने आले. यावर ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे टीका करतांना म्हणाले की, राष्ट्रध्वजापेक्षा कोणीही मोठा नाही. याचे जर सत्तेतील केंद्रीय मंत्री आणि आयोजक यांना भान नसेल, तर मग ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जनतेला देशाभिमान शिकवण्याची उठाठेव कशाला करता ? यावर ‘देशाच्या कार्यक्रमास विरोध करू नका’, असा उपदेश मंत्री कराड यांनी दिला. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे लोकार्पण करण्यात आले.

१३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९.४५ वाजता शहरातील तिसर्‍या १०० फुटी राष्ट्रध्वजाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. (लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून जनतेसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित आहे. – संपादक)

शहरातील किलेअर्क भागातील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानाजवळील मोकळ्या जागेत शहरातील तिसर्‍या १०० फुटी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.