निलंबित पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे यांच्यावर १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद !

कोल्हापूर, ७ ऑगस्ट (वार्ता.) – शेतभूमीच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागण्यासाठी निलंबित पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. तिवडे हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (निलंबित केलेले असतांनाही पोलीस नाईक तिवडे १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करतात, यावरून त्यांना कायद्याचा कसलाच धाक नसल्याचे स्पष्ट होते. लाचेच्या अनेक प्रकरणांत प्रशासकीय कर्मचार्‍यास ६ मास निलंबित केले जाते आणि परत कामावर घेतले जाते. यानंतर वर्षानुवर्षे खटला चालतो आणि त्यातील अगदीच थोड्यांना शिक्षा होते. त्यामुळे कुणी गुन्हा करण्यास धजावणार नाही, अशा कठोर शिक्षेची तरतूद आता आवश्यक आहे ! – संपादक)

तक्रारदाराचा पुणे खंडपीठ येथे शेत भूमीविषयी ‘महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण’ येथे दावा चालू आहे. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागण्यासाठी तिवडे यांनी तक्रारदाराकडे १ कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.