नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’

मुंबई – नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वांत मोठा धोका आहे. भारतीय सैन्य बिकट भौगोलिक परिस्थितीत बंदूकधारी नक्षलवाद्यांच्या विरोधात सक्षमपणे लढतच आहे; मात्र ही लढाई लढत असतांना भारतीय सैन्याच्या विरोधात ‘ग्रामीण लोकांच्या हत्या केल्या’, ‘महिलांवर अत्याचार केले’, ‘मानवाधिकाराचे उल्लंघन केले जाते’, असा दुष्प्रचार जेव्हा केला जातो, तेव्हा त्या वैचारिक लढाईत आपण पराभूत होत आहोत. बंदूकधारी नक्षलवादी फक्त २५ टक्के असून त्यांचे उर्वरित ७५ टक्के मनुष्यबळ वेगवेगळ्या माध्यमांतून हा नक्षलवाद चालू ठेवण्यामध्ये कार्य करत आहे. नक्षलवादाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे लेखक, पत्रकार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दुर्ग (छत्तीसगड) येथील अधिवक्त्या रचना नायडू यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

अधिवक्त्या रचना नायडू यांनी मांडलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अधिवक्त्या रचना नायडू

१. नक्षलवाद्यांना सामान्य माणसांपासून ते राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील लोकांपैकी ज्यांनी कुणी विरोध केला, त्या सर्वांना त्यांनी वेचून ठार मारले आहे. नक्षलवाद्यांकडून ज्या लोकांसाठी लढण्याचा दावा केला जातो, त्यांनाच मारले जाते आहे, ही कुठली क्रांती आहे ?

२. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी कुणीही त्यांच्या विचारधारेशी जोडलेले नसतात, असे त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात येते.

३. नक्षलवाद्यांनी त्यांचा प्रभाव असलेल्या भागांत अनेक हिंदूंची मंदिरे तोडली आहेत; मात्र चर्च किंवा अन्य प्रार्थनास्थळांची हानी केल्याचे ऐकिवात नाही.

४. छत्तीसगडमधील अतिशय दुर्गम भागात असणारे नक्षलवादी जे राज्याच्या राजधानीपर्यंत सुद्धा पोचू शकत नाहीत, ते ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ला जाहीर समर्थन करणे, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात, तसेच बेंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेशची हत्या झाल्यावर मात्र रस्त्यावर उतरतांना दिसले.

५. छत्तीसगडला पौराणिक आणि सांस्कृतिक इतिहास असतांनाही ‘नक्षलवाद्यांचे राज्य’ असा केला जाणारा दुष्प्रचार थांबायला हवा.