आत्महत्या करणारी व्यक्ती आधीच्या काही दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात होती ? त्यांचा एकमेकांशी संवाद कशा प्रकारे झाला ? त्यांचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते का ? कौटुंबिक कलह होता का ? मृत्यूच्या पूर्वी ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात होती ? अशा विविध अंगांनी अन्वेषण केल्यावर त्या व्यक्तीच्या आत्महत्येस कोणती व्यक्ती उत्तरदायी आहे ? याविषयीचा निष्कर्ष काढता येतो. यासंदर्भातील काही सूत्रे या लेखात दिलेली आहेत.
१. आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेत विविध कलमांची तरतूद असणे आणि परिस्थिती, साक्षीदार अन् पुरावे यांच्या साहाय्याने मृत्यूविषयीचा निष्कर्ष काढला जाणे
‘दळणवळण बंदीच्या काळात ‘आत्महत्या’ हा विषय सातत्याने चर्चेत राहिला. यामागे अभिनेते सुशांतसिंह राजपूत आणि त्यांच्यासारख्या अन्य कलाकारांच्या आत्महत्या हे कारण कदाचित् असू शकते. आत्महत्या करणे, हा गुन्हा आहे. त्यासमवेतच आत्महत्येला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रवृत्त करणे, हासुद्धा गुन्हा आहे. त्याविषयी भारतीय दंड संहितेत विविध गुन्ह्यांसाठी विविध कलमांची तरतूद आहे. नैसर्गिक आणि अनैसर्गिक या दोन प्रकारांमध्ये मृत्यूची नोंद विभागली जाते. एखादा आजार किंवा वयोमान यांमुळे होणारा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे समजण्यात येते. आत्महत्या, अपघात किंवा मनुष्यवध ही ३ कारणे अनैसर्गिक मृत्यूच्या मागे असू शकतात.
‘ज्या वेळी पोलीस अधिकार्याला एखाद्या मृतदेहाकडे पाहून संशय येतो, त्या वेळी मृत्यूच्या कारणाविषयी वैद्यकीय अधिकार्याचे मत मागवण्यात यावे’, असे फौजदारी प्रक्रिया संहितेत नमूद केलेले आहे. असा अहवाल येईपर्यंत पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करतात. शवविच्छेदनानंतर व्यक्तीचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे निश्चित झाल्यास तो कुठल्या कारणाने झाला असावा, हे शोधले जाते. याविषयी घटनास्थळावर असलेली परिस्थिती, साक्षीदार आणि पुरावे यांच्या साहाय्याने निष्कर्ष काढला जातो.
२. सदोष मनुष्यवधाच्या घटनेला आत्महत्येचे स्वरूप दिल्यावरही विविध मार्गांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक !
अनेकदा सदोष मनुष्यवधाला आत्महत्या किंवा अपघाताचे स्वरूप देऊन आरोपी स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असल्याविषयी अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. अशा वेळी मृत्यूपूर्वी मयताची कुणाशी झटापट झाली असेल, तर त्याविषयीच्या काही खुणा घटनास्थळी, मृतदेहावर किंवा आजूबाजूच्या परिसरात मिळण्याची शक्यता असते. समजा, एखाद्या व्यक्तीला गळा दाबून मारल्यावर तिला पंख्याला लटकवले आणि आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तिचा गळा दाबत असतांना तिने जो काही विरोध केला असेल, त्या काळात आरोपी किंवा मयताच्या शरिरावर काही इजा होऊ शकते. मयताच्या नखांमध्ये आरोपीचे रक्त, त्वचा आणि केस मिळण्याची शक्यता असते. एखाद्याला विष देऊन मारले असेल आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव केला असेल, तर ती गोष्टही रसायन विश्लेषकांच्या अहवालातून समोर येते. न्यायवैद्यक विज्ञानाच्या (‘फॉरेन्सिक सायन्स’च्या) साहाय्याने मयत किती वाजता जेवला होता ? त्याच्या मृत्यूची वेळ काय होती ? या गोष्टी जुळून आल्या नाहीत, तरीही संशय येऊ शकतो. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही ‘त्याची हत्या झाली असावी’, असा काही जण दावा करत आहेत. याविषयी खरे काय आहे ? ते अन्वेषणातून कधीतरी समोर येईलच !
३. एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येसाठी परिस्थिती निर्माण करणे, म्हणजे तिला आत्महत्येसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साहाय्य करणेच होय !
भारतीय दंड संहितेचे कलम ३०५, ३०६ अंतर्गत एखाद्या व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याविषयीच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम ३०५ हे विशेषत: लहान मुले आणि वेडसर व्यक्ती यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याविषयी आहे. आत्महत्या करण्यामागे व्यक्तीनुसार वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे त्याविषयी निश्चित असे कुणीही सांगू शकत नाही. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठी कलम ३०६ नुसार १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. आत्महत्येला प्रोत्साहन देणे, म्हणजे भारतीय दंड संहिता कलम १०७ नुसार चिथावणी देणे, षड्यंत्र रचणे आणि साहाय्य करणे होय. थोडक्यात सांगायचे, तर एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण होणे, म्हणजे त्या व्यक्तीला त्याविषयी चिथावणी देऊन आत्महत्येला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साहाय्य करण्यासारखे आहे.
४. आत्महत्येपूर्वीच्या अनेक गोष्टींच्या अभ्यासाअंती आत्महत्येस उत्तरदायी असणार्यांविषयी निष्कर्ष काढता येणे
आत्महत्या करणारी व्यक्ती आधीच्या काही दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात होती ? ती कुणाकुणाला भेटली ? यात प्रत्यक्ष बोलणे अथवा भ्रमणभाष, संदेश, ‘व्हॉट्सॲप’, ई-मेल यांचाही समावेश असू शकतो. त्यात कशा प्रकारे संवाद झाला ? त्या व्यक्तीचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते ? कुठल्या प्रकारचा कौटुंबिक वाद होता का ? मृत्यूच्या त्वरित आधी ती कोणत्या परिस्थितीतून जात होती ? अशा विविध अंगांनी अन्वेषण केल्यावर कोणती व्यक्ती आत्महत्येला उत्तरदायी आहे, याविषयीचा निष्कर्ष काढता येतो.
अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अनेकदा ‘सुसाईड नोट’ (आत्महत्येविषयीची चिठ्ठी) महत्त्वाची मानली जाते. बर्याच वेळा ‘सुसाईड नोट’ लपवल्याचे किंवा खोटी ‘सुसाईड नोट’ बनवल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आलेले आहे. त्यामुळे अशी कागदपत्रे मिळाले की, हस्ताक्षरतज्ञांच्या माध्यमातून ‘सुसाईड नोट’ खरी कि खोटी ? हे शोधले जाते.
५. व्यक्तीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यास तिच्या विरोधात त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करणे आवश्यक !
कलम ३०९ नुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा असून त्यासाठी एक वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे; पण अशा प्रकारचे प्रकरण पुष्कळ दुर्मिळ आहे. कौटुंबिक वादाच्या किंवा कर्जाच्या नावाने बरेच लोक आत्महत्या करून ‘तुम्हाला त्याच्याखाली अडकवू’, अशी धमकी सर्रासपणे देतात. अशा वेळी त्वरित पोलिसांत तक्रार देणे आवश्यक आहे. तसे झाल्यास ज्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिची इच्छा नसतांनाही तो यशस्वी झाला, तर विनाकरण अन्य कुणी त्यात अडकणार नाही.
आत्महत्येविषयी कायदे असले, तरी सर्वांनी एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवली पाहिजे की, आयुष्य एकदाच मिळते. त्यामुळे आपण अशा निराशाजनक विचारांपासून स्वत: आणि इतरांनाही दूर ठेवायला हवे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास योग्य ठिकाणी ती माहिती पोचवली पाहिजे, म्हणजे आपण एखाद्याचे जीवन वाचवू शकतो.’
– अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी अधिवक्ता, मुंबई.