महाराष्ट्रात नवीन उद्योग, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने अमेरिकेत व्यापार परिषद ! – ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

कोल्हापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’(महाराष्ट्रात गुंतवणूक करा) ही संकल्पना घेऊन अमेरिकेत रहाणारे भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार, विशेषत: महाराष्ट्रीयन उद्योगक आणि गुंतवणूकदार यांनी महाराष्ट्रात संयुक्त उद्योग उभारावेत, तसेच नवीन गुंतवणूक करावी या उद्देशाने अमेरिकेत ११ ते १४ ऑगस्ट ‘व्यापार परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद अमेरिकेतील ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने अटलांटिक सिटी, न्यू जर्सी येथे होणार आहे. या परिषदेसाठी चेंबरच्या नेतृत्वाखाली ५० उद्योजकांचे शिष्टमंडळ ९ ऑगस्ट या दिवशी अमेरिका येथे रवाना होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी संजय पाटील, जयेश ओसवाल यांसह अन्य उपस्थित होते.

ललित गांधी पुढे म्हणाले, ‘‘या परिषदेसाठी ४ सहस्र ५०० हून अधिक महाराष्ट्रीय उद्योजकांनी उपस्थित रहाण्यासाठी नोंदणी केली आहे. या परिषेदेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी आमची चर्चा झाली असून येणार्‍या उद्योजकांसाठी भूमी, वीज, तसेच अन्य सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता २ सहस्र कोटी रुपयांचा प्रस्ताव सिद्ध असून कोल्हापूर जिल्ह्यातही काही लोक ८०० एकर जागा उद्योग उभारण्यासाठी देण्यास सिद्ध आहेत. कोल्हापूरसाठी विशेष विचार केल्यास गुळापासून पुढील प्रक्रिया करण्याचे उद्योग उभे रहाण्यासाठी आमचे प्रयत्न रहातील.’’