… तर स्वत:च्या मुलाचे नाव ‘औरंगजेब’ का ठेवत नाही ? – रावसाहेब दानवे, भाजप

‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना प्रश्न

मुंबई – ज्या औरंगजेबाने मराठवाड्यावर अन्याय केला, तेथील लोकांना त्रास दिला, त्याचा तुम्हाला इतका पुळका येण्याचे कारण काय ? औरंगजेबाचे नाव एवढे चांगले असेल, तर तुम्ही स्वत:च्या मुलाचे नाव ‘औरंगजेब’ का ठेवत नाही ? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना केला आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे; पण याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची आणि मोर्चा काढण्याची चेतावणी इम्तियाज जलील यांनी दिली. याविषयी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये दानवे यांना विचारणा केली असता त्यांनी वरील प्रश्न उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, ‘‘औरंगजेब कसा होता ? हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. देहलीपासून गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात. संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुसलमान समाजातील एकाही मुलाचे नाव ‘औरंगजेब’ नाही. प्रथम स्वत:च्या मुलांची नावे ‘औरंगजेब’ ठेवायला प्रारंभ करा, मग आमच्या गावाला ‘औरंगाबाद’ म्हणा.’’