फोंडा (गोवा) – हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना आणि ‘नाट्यांजली नृत्य कलाकेंद्रा’च्या संस्थापिका डॉ. (सौ.) सहना भट यांनी २ ऑगस्ट २०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांच्या विद्यार्थिनी कु. निसर्गा दयन्नवर आणि कु. पूजा हेगडे या देखील उपस्थित होत्या. डॉ. (सौ.) सहना भट आणि त्यांच्या विद्यार्थिनी यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी संवाद साधला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत-नृत्य विभागाच्या समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या संशोधन कार्याविषयी माहिती दिली. डॉ. (सौ.) भट यांनी त्याविषयी जिज्ञासेने जाणून घेतले. डॉ. (सौ.) भट आणि त्यांच्या दोन्ही विद्यार्थिनी यांनी भरतनाट्यम् संदर्भातील विविध संशोधनात्मक प्रयोगांविषयी सुचवले, तसेच विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्या संगीत-नृत्याच्या संशोधनात्मक प्रयोगांमध्ये सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली.
६ ऑगस्टपर्यंत त्यांच्या येथील वास्तव्याच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने डॉ. (सौ.) भट यांच्या भरतनाट्यम् नृत्याचे सादरीकरण इत्यादी विविध प्रकारचे संशोधनाचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. (सौ.) सहना भट यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेल्या डॉ. (सौ.) सहना भट यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमालाही भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले. आश्रम पहातांना सौ. भट यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे पाहूया.
१. सनातनच्या आश्रमात आल्या आल्याच ‘या ठिकाणी वेगळ्या संवेदना जाणवत आहेत’, असे डॉ. भट म्हणाल्या.
२. आश्रम पहातांना स्वागतकक्षातील सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे सात्त्विक चित्र पाहून त्यांना त्यात ‘मारक भाव असल्याचे जाणवले आणि ते चित्र अधिक सजीव झाले आहे’, असे जाणवले.
३. ध्यानमंदिरात ठेवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र बघून डॉ. (सौ.) सहना भट यांना जाणवले की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सामान्य मानव नाहीत. त्यांचे हास्य श्रीकृष्णाप्रमाणे आहे. त्यांच्या रूपात श्रीकृष्णच येथे आला आहे.’ विशेष म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांना कोणतीही माहिती सांगितलेली नसतांनाही त्यांना ते वेगळेपण जाणवले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे हे भावोद्गार काढले.
डॉ. (सौ.) सहना भट या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून ‘त्या श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून सतत बोलत असतात’, असे त्यांनी सांगितले.
४. ‘ध्यानमंदिरातील श्री दुर्गादेवीच्या पितळी मूर्तीतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे त्यांना जाणवले.
– सौ. सावित्री इचलकरंजीकर
नटराज शिवाच्या चरणी समर्पितभावाने नृत्यार्चना करणार्या भरतनाट्यम् नृत्यगुरु डॉ. (सौ.) सहना भट !
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘डिसेंबर २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद) यांनी डॉ. (सौ.) सहना भट यांची त्यांच्या हुब्बळ्ळी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी उलगडलेला त्यांचा नृत्यविषयक साधनाप्रवास, त्यांचा नृत्याविषयी असलेला समर्पितभाव आणि नृत्य करतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत
१. डॉ. (सौ.) सहना भट यांचा परिचय
डॉ. (सौ.) सहना भट या अभियंता आहेत. त्यांनी ‘मी नृत्यक्षेत्रात येईन’, असा विचार कधीच केला नव्हता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना त्यांचे चेन्नईला जाणे होत असे. एकदा चेन्नई येथे गेल्यावर ‘कलाक्षेत्र’ ही संस्था पाहून त्या प्रभावित झाल्या. त्यांना ‘हे क्षेत्र किती छान आहे. या क्षेत्रात यायला हवे’, असे वाटले.
सौ. सहनाताई यांचे नृत्यातील आरंभीचे शिक्षण शिवमोग्गा (कर्नाटक) येथील (कै.) रवी दातार यांच्याकडे झाले. त्यांनी मैसुरू विद्यापिठातून नृत्यातील ‘पीएच्.डी.’ ही पदवी घेतली असून त्यासाठी त्यांना डॉ. के. कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. नृत्यसाधनेसाठी त्या चेन्नई येथील ‘कलाक्षेत्रा’च्या सौ. निर्मला नागराज यांचेही मार्गदर्शन घेतात.
त्या ‘नाट्यांजली नृत्य कलाकेंद्रा’च्या संस्थापिका आहेत. त्यांनी नृत्यक्षेत्रात पुष्कळ संशोधन केले असून त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या ४५ विद्यार्थिनी आता वेगवेगळ्या ठिकाणी भरतनाट्यम् शिकवत असून त्या त्यांच्या त्यांच्या भागातील प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.
२. डॉ. (सौ.) सहना भट यांच्या नृत्यसाधनेचा आरंभ
२ अ. आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि नृत्यासाठी मिळालेले कौटुंबिक सहकार्य : सौ. सहनाताईंच्या माहेरी धार्मिक वातावरण असल्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच भगवद्भक्ती रुजली. त्यांच्या कुटुंबियांचा ‘आपल्या जीवनात जे काही घडते, ते देवाच्या कृपेमुळे ! तोच आपल्याकडून सर्व करून घेतो’, असा भाव असतो. विवाहानंतर ‘सौ. सहनाताईंनी नृत्यक्षेत्रात यावे’, अशी त्यांच्या सासरच्या मंडळींची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबियांनी ‘सहनाताईंना नृत्यक्षेत्रात सर्वतोपरी योगदान देता यावे’, यासाठी सहकार्य केले.
३. शिकण्याची वृत्ती
३ अ. विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतांना स्वतःही नृत्यातील बारकावे शिकणे : सहनाताई म्हणतात, ‘‘वर्गातील विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतांना देव आम्हाला अनेक बारकावे शिकवत असतो. मी परिपूर्ण नाही. ‘कला’ हा एक अथांग सागर आहे. एखादी कला शिकण्यासाठी सात जन्मही अपुरे पडतील, एवढे त्यात अफाट ज्ञान आहे. त्यातले थेंब थेंब आम्ही शिकत जातो.’’
३ आ. स्वतः गुरुस्थानी असूनही अंतर्मुख राहून नृत्यक्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन घेणे : नृत्यातील नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सहनाताई नृत्यक्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन घेतात. या समवेत ‘स्वतःचे काही चुकत नाही ना ?’, याकडेही त्यांचे लक्ष असते. त्या वरिष्ठ शिक्षकांच्या शिबिरांना उपस्थित असतात. तेथे जाऊन त्या नृत्यातील वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात.
४. डॉ. (सौ.) सहना भट यांचे नृत्यसाधनेविषयी असलेले आध्यात्मिक दृष्टीकोन !
४ अ. ‘देवाला समर्पित होऊन नृत्य करणे’, हाच नृत्यसाधनेचा पाया असणे : सहनाताई म्हणतात, ‘‘१०० टक्के मनापासून आणि देवाला संपूर्णपणे समर्पित होऊन नृत्य केल्यावर नृत्यकलाकार नृत्याशी एकरूप होतो अन् तेव्हाच त्याची पेशीपेशी नृत्य करते. जेव्हा नृत्यकलाकाराचा प्रत्येक श्वास नृत्याशी जोडला जातो, तेव्हाच त्याला नृत्यकलेतून समाधान मिळते आणि हाच नृत्यसाधनेचा पाया आहे.’’ त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना या तत्त्वावर आधारित शिक्षण देतात.
४ आ. नृत्यकलाकाराने प्रस्तुत केलेल्या नृत्यातील भाव प्रेक्षकांच्या चेहर्यावर उमटणे, म्हणजे नृत्यकलाकाराला होत असलेली भगवंतभेट ! : ‘आनंद वर्तना’नामक एक सिद्धांत आहे. त्यानुसार नृत्यकलाकार नृत्यातून जो रस किंवा भाव प्रस्तुत करतो, तो भाव, तो आनंद किंवा ते समाधान प्रेक्षकांच्या चेहर्यावरही उमटले पाहिजे. त्या नृत्यातून प्रेक्षकांना आनंद मिळणे, म्हणजे नृत्यकलाकाराची जणू भगवंतभेट ! यालाच ‘नृत्याद्वारे भगवंताला स्पर्श करणे’, असे म्हणतात. सहनाताई म्हणतात, ‘‘नृत्यकलाकाराने नृत्य करतांना ‘भगवंत समोर उभा असून त्याच्यासाठी ही नृत्यप्रस्तुती आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक आहे.’’
५. डॉ. (सौ.) सहना भट यांना नृत्य करतांना आलेल्या अनुभूती !
५ अ. नटराजाच्या चरणी समर्पितभावाने नृत्याराधना केल्याने नृत्याला आवश्यक ते रसभाव नृत्यातून प्रकट होणे : सहनाताई त्यांचे नृत्य नटराजाला (शिवाला) समर्पित करतात. त्या ‘नृत्याच्या आरंभापासूनच समर्पितभाव कसा टिकून राहील ?’, यासाठी प्रयत्नरत असतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आवश्यक असणारे सर्व रसभाव त्यांच्या नृत्यात सहजपणे उतरतात, उदा. तांडव नृत्याच्या वेळी (शिवाने केलेल्या वीररसयुक्त नृत्याच्या वेळी) रौद्रभाव किंवा लास्य (पार्वतीने केलेले सुकोमल नृत्य) नृत्याच्या वेळी आनंदी भाव ! त्यांचे नृत्य बघतांना प्रेक्षकांना हा योगायोग वाटतो. यावर सहनाताई म्हणतात, ‘‘नृत्यात समर्पितभाव जितका अधिक असेल, तेवढा नृत्याचा परिणाम अधिक होऊन त्याचे समाधान लाभते. हे केवळ देवाच्या कृपेमुळेच शक्य आहे. ‘मी काहीतरी केले आहे’, असे काहीच नाही, असे प्रकर्षाने लक्षात येते.’’
५ आ. ‘देवाला संपूर्णपणे समर्पित होऊन नृत्य केल्यावर अनेकदा आशीर्वादस्वरूप पाऊस पडतो’, असे सहनाताईंनी अनुभवणे : सहनाताई म्हणतात, ‘‘इतिहासात राग ‘मेघमल्हार’ गायल्यावर पाऊस पडला किंवा ‘दीप’ राग गायल्यावर दिवे प्रज्वलित झाले, तशा प्रकारच्या अनुभूती आजही काही प्रमाणात येऊ शकतात. सहनाताई यांनी ‘देवाला संपूर्णपणे समर्पित होऊन नृत्य केल्यावर पाऊस पडला’, असे अनेकदा अनुभवले आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
|