खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ

खासदार संजय राऊत (डावीकडे)

नवी देहली – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेमुळे १ ऑगस्ट या दिवशी संसदेमध्ये विरोधी पक्षांकडून गदारोळ करण्यात आला. यामुळे कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाज दुपारी १२ आणि त्यानंतर २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.

१. शिवसेनेच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना काँग्रेससह इतर पक्षांची साथ मिळाली. या गदारोळाच्या प्रकरणी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना समज दिली.

२. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत राऊत यांच्या अटकेचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी भाजपच्या घाबरवण्याच्या आणि धमक्यांच्या राजकारणाला भीक घातली नाही. ते दृढ विश्‍वास असलेले आणि धाडसी नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.