बिजनौर (उत्तरप्रदेश) येेथील मजार तोडफोडीची आता ‘एन्.आय.ए.’ चौकशी करणार

बिजनौर (उत्तरप्रदेश) – हिंदूंप्रमाणे वेशभूषा करून, तसेच भगवा फेटा बांधून बिजनौर येथील ३ मजारींची (मुसलमानाच्या थडग्यांची) तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद आदिल आणि महंमद कमाल यांना नुकतीच अटक केली होती. या तोडफोडीचे खापर हिंदूंवर फोडून कावड यात्रेच्या कालावधीत दंगल घडवण्याचे षड्यंत्र आरोपींनी रचले  होते. या प्रकरणाचा अरब देशांशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपी कमाल याच्या कुवेतशी असलेल्या संबंधाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्याचे सांगण्यात येत आहे. या तोडफोडीच्या प्रकरणाची चौकशी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी सांगितले की, बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्‍याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती. दोघांनी समाधीवरील चादर आणि पडदे जाळले होते. यासह त्याच दिवशी सकाळी या दोन्ही भावांनी घोशियावाला परिसरातील एक कबर आणि कुतुबशहाचे थडगे यांचीही तोडफोड केली होती. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.