मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा !

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहली येथे भेट 

कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये; म्हणून ४०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी शिवसैनिकांना खासदार माने यांच्या घरापासून काही अंतरावर रोखले. त्यामुळे शिवसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठाण मांडले. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार करत आहेत. ‘मोर्चाला विरोध करू नका’, असे आवाहन खासदार माने यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे.

कोल्हापूर येथे मोर्चा चालू असतांना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहली येथे भेट घेऊन पंचगंगा नदी प्रदूषण, पूरस्थिती, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, या तसेच अन्य प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली.