कोयना धरण ५० टक्के भरले !
कोल्हापूर, १६ जुलै (वार्ता.) – १५ जुलैपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी संथगतीने अल्प होत आहे. १६ जुलै या दिवशी राजाराम बंधारा येथे सकाळी १० वाजता पाण्याची पातळी ३७ फूट ९ इंच इतकी नोंदवली गेली. यामुळे पुराच्या धास्तीपासून कोल्हापूरकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १६ जुलै या दिवशी सकाळी १० वाजता कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सध्या चालू असलेला १ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग वाढवून तो १ लाख ५० सहस्त्र घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना धरण आता ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून धरणात ५२.१५ ‘टी.एम्.सी.’ (क्षमता १०५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा आहे. सांगली येथील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी घटली असून ती आता १८ फूट १० इंच आहे.