‘मटर पनीर’ऐवजी ‘चिकन करी’चे पार्सल पाठवल्याने हॉटेलला द्यावी लागणार २० सहस्र रुपये हानीभरपाई !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथील एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्‍या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही. याविषयी ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यावर मंचाने ‘गिर्‍हाईकाला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याने ‘जिवाजी क्लब’ने संबंधित कुटुंबाला २० सहस्र रुपयांच्या हानीभरपाईच्या समवेत न्यायालयीन लढा लढण्यासाठी आलेला खर्च द्यावा’, असा आदेश दिला.

येथील अधिवक्ता सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी २६ जून या दिवशी ‘झोमॅटो’द्वारे ‘मटर पनीर’ची मागणी केली असता त्यांना मिळालेल्या ‘पार्सल’मध्ये ‘चिकन करी’ होती. श्रीवास्तव यांनी याविषयी सदर हॉटेलमध्ये तक्रार करूनही त्यांना काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शेवटी न्यायासाठी ग्राहक मंचाकडे जावे लागले.