‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सर्वाेच्च न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

१७.६.२०२२ या दिवशी गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांना एक आनंदवार्ता समजली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘देहली येथील सर्वाेच्च न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतांना अधिवक्ता उमेश शर्मा

१. पूर्वसूचना मिळणे

अधिवक्ता उमेश शर्मा जेव्हा अधिवेशनात बोलत होते, तेव्हा त्यांचा चेहरा पुष्कळ उजळलेला दिसत होता. त्यांचे बोलणे इतके मृदु आणि सात्त्विक होते की, ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या मुखावरील चैतन्यदायी पिवळसर रंगाचे तेज पाहून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे जाणवत होते.

२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करणे

कु. मधुरा भोसले

जेव्हा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्‍यांतून मुक्त झाले’, असे घोषित केले, तेव्हा अधिवक्ता उमेश शर्मा यांच्या मनातील आनंद त्यांच्या मुखावर दिव्य तेजाच्या रूपात प्रकट झाला. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर अधिवक्ता उमेश शर्मा यांच्यातील सुप्तावस्थेत असणारे चैतन्य पिवळसर रंगाच्या चैतन्याच्या रूपाने प्रकट झाले आणि ते त्यांच्या आज्ञाचक्रातून प्रक्षेपित झाले. तेव्हा कार्यक्रमस्थळी उपस्थित असणार्‍या सर्वांना आनंदाची अनुभूती आली.

३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता उमेश शर्मा यांना सनातन-निर्मित ‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन’ यांचे चित्र भेट दिल्यावर सूक्ष्म स्तरावर घडलेली प्रक्रिया

अधिवक्ता उमेश शर्मा यांच्यातील भावामुळे चित्रातील भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व जागृत झाले. तेव्हा या चित्राच्या भोवती चैतन्याचे तेजोवलय कार्यरत झाले आणि या वलयातून चैतन्याची पिवळी अन् आनंदाची गुलाबी रंगांची वर्तुळे वायूमंडलात प्रक्षेपित झाली. त्यामुळे वातावरणातील कृष्णतत्त्वाचे प्रमाण वाढून सर्वांना आनंदाची अनुभूती आली.

४. अधिवक्ता उमेश शर्मा यांनी मनोगत व्यक्त करणे

जेव्हा अधिवक्ता उमेश शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले, तेव्हा त्यांच्या वाणीमध्ये भावाची निळसर, चैतन्याची पिवळी आणि आनंदाची गुलाबी रंगाची स्पंदने कार्यरत होऊन ती वातावरणात पसरली. ही स्पंदने कार्यक्रमस्थळी उपस्थित असणार्‍या प्रत्येकाला अनुभवण्यास मिळाली. तेव्हा श्री. शर्मा यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला होता. त्यांच्या भावावस्थेतील मनोगत ऐकत असतांना श्रोत्यांचाही भाव जागृत झाला होता.

५. अधिवक्ता उमेश शर्मा यांच्यातील विविध योगमार्गांनुसार असणारी आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

६. अधिवक्ता उमेश शर्मा यांच्यातील  विनम्रभाव आणि जिज्ञासूवृत्ती या गुणांमुळे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन ते लवकरच संतपद प्राप्त करणार असणे

श्री. शर्मा यांच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांचा संगम झालेला आहे अन् त्यांच्यामध्ये अनेक दैवी गुण आहेत; परंतु त्यांना त्याचा लेशमात्र अहंकार नाही. ‘त्यांच्यातील विनम्रभाव आणि जिज्ञासूवृत्ती यांच्यामुळे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती झालेली आहे आणि पुढेही अशीच चालू राहून ते लवकरच संतपद प्राप्त करणार आहेत’, असे मला भगवंताने सांगितले.

७. श्रीगुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना

श्रीगुरूंच्या कृपेमुळे अधिवक्ता उमेश शर्मा यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या सोहळ्यात सहभागी होऊन हा दिव्य सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे ‘श्री. शर्मा यांच्याकडून अनेक गुण शिकता आले’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते. ‘त्यांच्यासारखा समर्पणभाव आणि त्यागी वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्रीगुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.