भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे भूमीपूजन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १० जुलै (वार्ता.) – पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे. राज्याला ‘सुजलाम् सुफलाम्’ करून विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’

१५ एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार असून यामध्ये गुरुकुल शिक्षणपद्धती, बाल संस्कारवर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्तनिवास, असे विविध उपक्रम होणार आहेत. मंदिर परिसर विकासासाठी राज्यशासन आवश्यक ते  सहकार्य करेल, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिर परिसरातील प्रभुपाद घाटाची पहाणी केली.


प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १० जुलै (वार्ता.) – आषाढी वारीच्या निमित्ताने  प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या  उपक्रमाचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘एकदा वापर करून फेकून देण्यात येणार्‍या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.’’

विशेष घटना

विविध फुले आणि विद्युत् रोषणाईने सजवण्यात आलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

१. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरनगरी सजली होती. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विविध फुले आणि विद्युत् रोषणाई यांनी सजवण्यात आले होते.

भर पावसातही छत्री, रेनकोट यांचा वापर करत वारीत चालणारे भाविक

२. मागील ४ दिवसांपासून सतत चालू असणार्‍या पावसाला न जुमानता भाविकांनी रेनकोट, छत्री, प्लास्टिक कागद डोक्यावर घेऊन दिंडीत पायी चालत पंढरपूरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

चंद्रभागेत स्नान करतांना वारकरी भाविक