पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ दिवस ‘रेड अलर्ट’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर, ६ जुलै (वार्ता.) – हवामान विभागाने पुढील ३ दिवस सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. त्यासाठी या चारही जिल्ह्यांत एन्.डी.आर्.एफ्.’ची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथके दाखल झाली आहेत. पंचगंगेची पाणीपातळी ३० फुटांवर (इशारा पातळी ३९ फूट) पोचली असून आता संथगतीने त्यात वाढ दिसून येत आहे. प्रशासनाकडून चेतावणी मिळताच नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

राधानगरीसह काळम्मावाडी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील पाणीपातळी वाढली आहे. राधानगरीच्या धरणातील पाणीपातळी ४ फुटांनी वाढली आहे त्यामुळे राधानगरी धरणातून १ सहस्र २०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. पंचगंगा नदीवरील २७ बंधारे पाण्याखाली असून ‘एन्.डी.आर.एफ्.’च्या पथकाने आज सकाळी पंचगंगा नदीवर पहाणी केली. गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने ६ जुलै या दिवशी सकाळपासून काहीशी उसंत घेतल्याने काही प्रमाणात कोल्हापूरकांना दिलासा मिळाला आहे.

अन्य घडामोडी

१. कोयना धरणात सध्या १८ ‘टी.एम्.सी.’ (क्षमता १०५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा असून सांगली येथील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ६ फूट इतकी नोंदवली आहे.

२. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात दरड कोसळली आहे. संततधार पडणार्‍या पावसाने या घाटात दरडी कोसळत आहेत.