कॅनडातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून संबंधितांना ‘काली’ नावाचे भित्तीपत्रक तात्काळ हटवण्याचे आवाहन

भित्तीपत्रकाद्वारे श्री कालीमातेचा अवमान केल्याचे प्रकरण

कॅनडातील हिंदूंकडून भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडे तक्रारी

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

टोरंटो (कॅनडा) – लीना मणीमेकलई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या प्रकाशित करण्यात आलेल्या भित्तीपत्रकात श्री महाकालीदेवीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढतांना दाखवण्यात आल्यानंतर त्यास विरोध होत आहे. टोरंटो येथील ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आल्यानंतर ते येथील आगा खान संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. याविषयी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून कॅनडातील अधिकारी आणि ‘फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजक यांना आगा खान संग्रहालयातून हे भित्तीपत्रक काढण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, या भित्तीपत्रकामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. संबंधित भित्तीपत्रकातून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आला आहे. आम्ही आमच्या भावना कार्यक्रमाच्या आयोजकांपर्यंत पोचवल्या आहेत. आम्ही कॅनडाच्या अधिकार्‍यांना आवाहन करतो की, त्यांनी आक्षेपार्ह भित्तीपत्रक तात्काळ हटवावे.