आजपासून विधानसभेचे अधिवेशन, तर ४ जुलैला सरकारची बहुमताची परीक्षा !

आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई येथे परतले !

मुंबई – राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ४ जुलै या दिवशी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी ३ जुलै या दिवशी राज्य विधानसभेचे २ दिवसांचे ‘विशेष अधिवेशन’ चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे २ जुलै या दिवशी पहाटे ४ वाजता गोवा येथे आले. पणजी येथे एका उपाहारगृहात मुक्कामास असलेल्या आपल्या ५० समर्थक आमदारांसमवेत ते आज मुंबई येथे परत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष, असे एकूण ५० आमदार गेल्या ३ दिवसांपासून गोवा येथे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसमवेत गोवा येथे आहेत. २ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता बंडखोर आमदारांसमवेत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली.

मुंबई येथे ‘सी.आर्.पी.एफ.’चे २ सहस्र सैनिक तैनात !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेचे ५० टक्क्यांहून अधिक आमदार गेल्याने शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्यासाठी ‘सी.आर्.पी.एफ.चे २ सहस्र सैनिक मुंबई येथे तैनात आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे !

मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या बंडखोर गटाकडे गेल्याने विधानसभा अध्यक्षपद आपोआप भाजपकडे आले आहे. ३ जुलै या दिवशी होणाऱ्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजपने मूळचे शिवसेनेचे; पण सध्या सेनेचे कट्टर विरोधक असलेले आणि कायद्याचे जाणकार म्हणून ओळख असलेले दक्षिण मुंबई येथील कुलाबामधील भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड केली आहे. राहुल नार्वेकर हे आजपर्यंतचे सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष ठरणार आहेत. ते विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.