मुंबई – विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अल्प मतात गेले आहे. तसेच तांत्रिक सूत्रांविषयी बंडखोर आणि सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपने महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची सिद्धता चालू केली असल्याची माहिती आहे. त्यांनी सरकार स्थापनेच्या विषयी कायदेशीर चाचपणी चालू केली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली.
भाजप आणि शिंदे गट यांच्यात मंत्रीमंडळ रचनेविषयी तीन फेऱ्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्यसंख्या ४२ इतकी असते. शिंदे गटाला १६ मंत्रीपदे दिली, तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचे काही समर्थक अपक्ष आमदार आहेत, त्यांचे समाधान आपापल्या पातळीवर करावे, असे प्राथमिक टप्प्यात ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.