आषाढीपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांसह अन्य मठांचे ‘फायर ऑडिट’ !

सोलापूर, २१ जून (वार्ता.) – आषाढी यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेचे अग्नीशमन विभागाचे केदार आवटे यांची ‘इन्सिडंट कंमाडर’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांसह अन्य मठांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे दायित्व देण्यात आले आहे. वारीकाळात कुणालाही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र
‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्वाधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.

आषाढी यात्रेसाठी यंदा १२ ते १५ लाख भाविक येणार असल्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने नियोजन चालू केले आहे. पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त एन्. सोनवणे यांना पंढरपूर येथील भटकी जनावरे, कुत्री, तसेच अन्य भटके प्राणी यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथे पाणीपुरवठा आणि टँकर पुरवण्याचे संपूर्ण दायित्व उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे देण्यात आले आहे. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी, तसेच नदीपात्रातील वाहतूक बोटी याचे दायित्व देण्यात आले आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना यात्रेच्या काळात येणाऱ्या पालख्यांना लागणार विद्युत् पुरवठा, तसेच पाणीपुरवठ्यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांना यात्रा काळात पंढरपुरातील गॅस, पेट्रोल पुरवठा, तसेच डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना यात्रेच्या काळात कोणत्याही भागांत मद्यविक्री होणार नाही आणि वारकऱ्यांना त्रास होणार नाही याचे दायित्व देण्यात आले आहे. यात्राकाळात शहरातील ११० कुपनलिकांमधून पाणी उपलब्ध होणार असून शहरात टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.