पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जून या दिवशी झाले. २१ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. कोरोनाच्या २ वर्षांच्या निर्बंधांमध्ये पायी वारी आणि पालखी सोहळा रहित करण्यात आला होता. सलग २ वर्षे संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला एस्.टी. बसने पंढरपूरला नेण्यात आल्या. या वर्षी प्रस्थान, पालखी सोहळा आणि पंढरीची पायी वारी लाखो वैष्णवांच्या साक्षीने होणार आहे. त्या अनुषंगाने देवस्थान आणि प्रशासन यांच्या वतीने जय्यत सिद्धता करण्यात येत आहे. आषाढी पालखी सोहळ्यासाठी देहू येथे १३ ठिकाणी ८०० आणि आळंदी येथे २१ ठिकाणी १ सहस्र तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे.