धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही ! – भारत

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती

न्यूयॉर्क – धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ (अब्राहमला मानणारे ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म) धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत. भारत सीमापार आतंकवादाचा सर्वांत मोठा बळी ठरला आहे. लोकशाहीच्या तत्त्वांना चालना देऊन आतंकवादाचा सामना करण्यासाठी खर्‍या अर्थाने योगदान देणारी शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी केले आहे.

द्वेषयुक्त भाषणाचा विरोध करणार्‍या आंतरराष्ट्रीय दिनाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तिरुमूर्ती बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही वारंवार यावर भर दिला आहे की, भारताच्या बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे शतकानुशतके येथे आश्रय घेणार्‍या सर्व लोकांसाठी ते सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. कट्टरतावाद आणि आतंकवाद यांना तोंड देणारी ही आपल्या देशाची अंगभूत शक्ती आहे.