नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

काही ठिकाणी हिंसाचार !

नवी देहली – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना अटक करावी, यासाठी शुक्रवार, १० जूनच्या दिवशी देहलीतील जामा मशीद, उत्तरप्रदेशातील देवबंद, मुरादाबाद आणि प्रयागराज, बिहारमधील भोजपूर, झारखंडमधील रांची, पंजाब, जम्मू, महाराष्ट्रातील सोलापूर अन् नवी मुंबई, कर्नाटकातील बेळगाव, तेलंगाणा आदी ठिकाणी नमाजपठणानंतर मुसलमानांनी निदर्शने केली. प्रयागराज आणि मुरादाबाद येथे मुसलमानांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर हावडा येथे ९ जून या दिवशी रस्ता अडवण्यात आला होता.

ओवैसी यांच्या लोकांकडून निदर्शने करण्यात आल्याचा मशीद कमिटीचा दावा

देहलीच्या जामा मशिदीबाहेर नमाजपठणानंतर मुसलमानांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी आधीच मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवला होता. ‘या निदर्शनांचे आवाहन जामा मशिदीकडून करण्यात आले नव्हते’, असा दावा मशीद कमिटीकडून करण्यात आला. कमिटीने म्हटले की, निदर्शने करणारे कोण होते ?, हे आम्हाला ठाऊक नाही. तरी आम्हाला वाटते की, ते एम्.आय.एम्.चे, असदुद्दीन ओवैसी यांचे लोक होेते. आम्ही स्पष्ट केले की, ते विरोध करू इच्छित असतील, तर त्यांनी करावा; मात्र आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही.

प्रयागराज आणि मुरादाबाद येथे दगडफेक

प्रयागराज येथे नमाजपठणानंतर मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात काही पोलीस घायाळ झाले. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. यात त्यांचा सुरक्षारक्षक घायाळ झाला. मुरादाबाद येथेही दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराची नोंद उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला. सहारनपूर येथील देवबंदही येथेही नमाजानंतर नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी निदर्शने करण्यात आली. या वेळी नूपुर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

हावडा येथे रस्ता अडवला !

हावडा येथे ९ जून या दिवशीच सहस्रोंच्या संख्येने उपस्थित मुसलमानांनी येथे महामार्ग रोखून धरला. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. २० किलोमीटरपर्यंत वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मुसलमानांनी रस्त्यावर टायर जाळून
फेकले होते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘संकुचित राजकीय लाभासाठी काही लोक धार्मिक राजकारण करत असून त्याची हानी आम्ही का सोसावी ? तुम्ही उत्तरप्रदेश आणि गुजरात येथे जाऊन विरोध करा, तेथे भाजपची सत्ता आहे. त्यांची बंगालमध्ये सत्ता नाही. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन करू नये. आम्ही हात जोडून सांगतो की, राजकारणापासून दूर रहा. कुणीतरी एक दिवसासाठी तुम्हाला प्रोत्साहित करील आणि नंतर पुन्हा येणार नाही. जर येथे दंगल झाली, तर त्यावर कुणाकडेच उत्तर नसेल. मी अशा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. तुम्ही अप्रसन्न असाल, तर देहलीला जावे. तेथे शांततेच निदर्शन करा आणि पंतप्रधानांच्या त्यागपत्राची मागणी करा. येथे समस्या निर्माण का करता ?’’

जम्मू येथे नूपुर शर्मा यांचे छायाचित्र जाळले

जम्मू येथेही मुसलमानांनी नमाजपठणानंतर नूपुर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने केली. शर्मा यांचे छायाचित्र जाळण्यात आले. डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथे दगडफेक करण्यात आली. ९ जून या दिवशी एका मशिदीमध्ये मौलानाने नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचे चिथावणीखोर विधाने केल्यामुळे येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती, तरीही १० जून या दिवशी येथे दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे सैन्याला पाचारण करण्यात आले.

बेळगाव येथे नूपुर शर्मा यांचा पुतळ्याला फासावर लटकवले !

बेळगाव येथे मुसलमानांनी मोर्चा काढून नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला भर चौकात फासावर लटकवले.

संपादकीय भूमिका 

  • महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यानंतर भारतातील मुसलमान आणि जगभरातील इस्लामी देश संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदूंच्या देवतांचा प्रतिदिन अवमान होत असतांना हिंदू निष्क्रीय रहातात ! असे असंघटित आणि धर्माभिमानशून्य हिंदू जिहाद्यांकडून मारले गेले, तर आश्‍चर्य ते काय ?