पुणे, ७ जून (वार्ता.) – येथील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शंभू गवारे (६३ टक्के आध्यात्मिक पातळी), समितीचे श्री. पराग गोखले (६१ टक्के आध्यात्मिक पातळी), ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंखे, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे (६२ टक्के आध्यात्मिक पातळी) आदी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र अधिवेशनात समस्येवर केवळ चर्चा होत नसून उपाय सांगितले जातात ! – डॉ. नीलेश लोणकर
हिंदु राष्ट्र अधिवेशनात समस्येवर केवळ चर्चा होत नसून त्यावर उपाय सांगितले जातात, तसेच प्रभावी संघटन कसे असावे ? आणि त्याने काय लाभ होतात ? यावरही दिशादर्शन केले जाते, असे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी सांगितले.
राज्यघटनेच्या आधारे हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंखे
‘डेटिंग ॲप’, ‘मॅट्रिमोनियल ॲप’ यांवरून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. एकल स्त्रिया आणि पुरुष यांचा अपलाभ घेऊन त्यांना फसवले जाते. हिंदु धर्माचे आचरण, धर्मशिक्षण आणि हिंदूंचा प्रभावी इतिहासच येणाऱ्या काळात जगाला वाचवू शकणार आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या आधारे हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे.
भारत विश्वगुरु होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र निर्माण होणे आवश्यक ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘लष्कर-ए-हिंद’
मुंबई – भारताला विश्वगुरुपदी आरूढ झालेले पहाण्यासाठी भारत हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र निर्माण होणे, ही ईश्वरी योजना आहे, असे प्रतिपादन ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या.
ईश्वरप्रसाद खंडेलवाल पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? आणि ते संवैधानिक मार्गाने कसे निर्माण करायचे ? याविषयी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. वैदिक सनातन संस्कृतीचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सर्व देशांनी साहाय्य करावे.
क्षणचित्रे
या वेळी काश्मीर येथील हिंदूंचे रक्षण, अधिवेशनामुळे हिंदूंमध्ये होत असलेली जागृती यांविषयी काही पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे सकारात्मक प्रश्न विचारले.
पंढरपूर देवस्थानची भूमी परत मिळणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आणि तुळजापूर येथील देवस्थानांचे ‘सीआयडी’ अन्वेषण हे अधिवेशनांचे फलित ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर, ७ जून (वार्ता.) – गेल्या १० वर्षांपासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांमुळे राष्ट्रीय स्तरावर व्यापक जागृती निर्माण झाली आहे. उद्योजक, अधिवक्ता अशा प्रत्येक क्षेत्रातील हिंदूंचे संघटन उभे राहिले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या न्यायालयीन, तसेच प्रत्यक्ष लढ्यांमुळे पंढरपूर येथील देवस्थानची १ सहस्राहून अधिक एकर भूमी देवस्थानला परत मिळाली. अनेक देवस्थानांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढे उभे राहिले. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि तुळजापूर येथील देवस्थान यांची ‘राज्य गुन्हे अन्वेषण शाखे’कडून (सीआयडीकडून) अन्वेषण होणे, हे या अधिवेशनांचे फलित आहे, असे उत्तर हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी दिले. ते गोवा येथे होणाऱ्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या संदर्भात कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे (६१ टक्के आध्यात्मिक पातळी) उपस्थित होते.
हिंदुहिताची चर्चा आणि प्रत्यक्ष कृती होणाऱ्या या अधिवेशनाला प्रसिद्धीमाध्यमांनी अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी ! – शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी म्हणाले, ‘‘यापूर्वी झालेल्या काही अधिवेशनांना मी उपस्थित राहिलो आहे. हिंदु धर्मावर होणारे आघात, हिंदू संघटित होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ? यांसह अनेक विषयांवर त्यात मंथन झाले आहे. तरी हिंदू हिताची चर्चा आणि प्रत्यक्ष कृती होणाऱ्या या अधिवेशनाला प्रसिद्धीमाध्यमांनी अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी.’’
क्षणचित्रे
१. पत्रकार परिषदेसाठी २० पत्रकार उपस्थित होते.
२. सर्वांनी विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिर सरकारीकरण, ‘नूपुर शर्मा विषय’, ‘विधवा प्रथा या संदर्भात समितीची भूमिका’ यांसह विविध विषयांवर समितीची भूमिका जिज्ञासेने जाणून घेतली.
आतापर्यंत हिंदूंच्या विविध धर्मसंसदा झाल्या, त्यात काही वादग्रस्त वक्तव्ये झाली. तशी या अधिवेशनात न होण्यासाठी समिती काय काळजी घेणार आहे ? असे पत्रकारांनी विचारले असता श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘विविध धर्मांचार्यांची झाली ती धर्मसंसद होती आणि गोवा येथे होणारी ‘हिंदु राष्ट्र संसद’ आहे. यात मांडला जाणारा प्रत्येक विचार आणि कृती ही घटनात्मक मार्गाने प्रामुख्याने ‘हिंदु राष्ट्र व्हावे’ याच उद्देशाने अन् धर्महितार्थच असणार आहे.’’ |