गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

काश्मीरमध्ये चालू असलेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे आतंकवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील काही दिवसांत कुलगाम, अनंतनाग, बारामुल्ला, डोडा, पुलवामा, कुपवाडा आदी अनेक ठिकाणी आतंकवाद्यांनी सलग आक्रमणे केली आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यावर ‘पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना मिळणारी फूस बंद होऊन येथील आतंकवादी कारवाया थांबतील’, अशी काही प्रमाणात आशा होती; परंतु आतंकवाद्यांच्या कारवाया पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. पाकमधील सत्तांतर, भारतावर कुरघोडी करण्यासाठी पाकिस्तानला अमेरिका-चीन आदींकडून मिळणारी फूस, जम्मू-काश्मीरमध्ये राहून पाकिस्तानशी हितसंबंध ठेवणारे, भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश आदी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या आतंकवादी आक्रमणामागे आहेत. असे असले, तरी भारतीय शासनकर्त्यांची कणखर भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणारी आहे.

सद्यःस्थितीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची ढासळत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये १ किलो साखरेसाठी २०० रुपये मोजावे लागत आहेत. शासकीय सेवेतील नोकरदारवर्गाला वेतन देण्यासाठीही पाककडे पैसे नाहीत. पाकने कर्ज फेडण्यासाठी हुंजा खोरे चीनला भाड्याने देत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. इतकी बिकट आर्थिक स्थिती असतांनाही पाकच्या भारतविरोधी कुरघोड्या थांबलेल्या नाहीत आणि थांबणारही नाहीत; कारण भारतद्वेष पाकिस्तानच्या रक्तातच भिनला आहे. पाकचा निःपात हाच भारतद्वेषावरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात गांधीवादाची प्रतिमा सांभाळत रहाण्यापेक्षा पाकच्या आतंकवादाचा मुखवटा जगासमोर आणून भारताला पाकिस्तानच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावीच लागेल.

…यांनाही चितपट करावेच लागेल !

११ एप्रिल या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची धुरा शाहबाज शरीफ यांनी स्वीकारली. यानंतर आतंकवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एप्रिल २०२२ या एका मासात ९ वेळा आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. सद्यःस्थितीत आतंकवाद्यांना पोसण्याइतकी पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाही. असे असतांना पाकिस्तानकडून होणाऱ्या आतंकवादी कारवाया या केवळ अमेरिका आणि चीन यांच्या पाठबळानेच शक्य आहेत. एकीकडे स्वत:च्या देशावर आक्रमण झाल्यावर आकाशपाताळ एक करणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र आतंकवादी कारवायांसाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. स्वत:कडील महासत्ता टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका आणि महासत्ता होण्याची राक्षसी वृत्ती बाळगणारा चीन प्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना या दोन्ही देशांचा छुपा पाठिंबा आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने पाकिस्तानला सर्व बाजूने चीतपट केले आहे; परंतु पाक ज्यांच्या जिवावर उड्या मारत आहे, त्यांनाही चितपट करण्याइतके सामर्थ्य वाढवल्याविना भारताला पर्याय नाही.

भूमीच्या तुकड्यासाठी नव्हे, काफिरांच्या विरोधातील लढाई !

पाकिस्तानची निर्मिती झाल्याच्या दिवसापासूनच पाकिस्तानने भारताच्या विरोधात आतंकवादी कारवाया चालू केल्या. आतापर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले आहे; मात्र पाकच्या विरोधात भारताने नेहमीच सौम्य भूमिका बाळगली. विशेषत: काँग्रेसच्या सत्ताकाळात अल्पसंख्यांकांच्या मतांचा विचार करून आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वत:ची ‘शांतीदूत’ ही प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी पाकशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा भारताने प्रयत्न केला; परंतु ही मैत्री कदापि शक्य नाही; कारण पाकिस्तानची भारतविरोधी लढाई ही भूमीच्या तुकड्यासाठी नसून काफिरांच्या विरोधातील आहे. आतापर्यंत भारतावर ज्या मोगलांनी आक्रमण केले, ते या भूमीला इस्लामभूमी करण्यासाठीच. पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारताविरोधी कारवाया करतो, तेव्हा तो काफिरांच्या विरोधात लढत असतो. भारतासमवेत खेळला जाणाऱ्या क्रिकेटच्या सामन्याकडेही पाकिस्तान ‘काफीरविरोधी’ म्हणून खेळतो, तेथे युद्धाची गोष्ट ती काय ? त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात लढतांना राष्ट्रवादासमवेत ‘हिंदुत्वनिष्ठा’ बाळगण्यावाचून पर्याय नाही. भारतातील हिंदूंनी स्वत:ला कितीही निधर्मी आणि सर्वधर्मसमभाव बाळगणारे असे दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी पाकिस्तानच्या दृष्टीने हिंदू काफीरच आहेत, हे हिंदूंनी समजून घ्यायला हवे.

इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासा !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर एका वर्षाने म्हणजे वर्ष १९४८ मध्ये ज्यूंचे इस्रायल स्वतंत्र झाले. केवळ ८९ लाख लोकसंख्या असलेल्या या राष्ट्राला सर्व बाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढले आहे; परंतु या सर्व राष्ट्रांना इस्रायल पुरून उरले आहे. ज्या बंदुकीतून इस्रायलकडे गोळी येते, ते हातच नाहीत, तर ते ठिकाणही इस्रायल नेस्तनाबूत करते. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतका प्रखर राष्ट्राभिमान बाळगल्याविना इस्रायलला पर्याय नाही.

खरे तर भारतानेही इतका प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी ‘गांधीवाद’ नव्हे, तर प्रखर राष्ट्रनिष्ठा आवश्यक !