१. पेठेत मिळणारा ‘विषयुक्त’ भाजीपाला आणि फळे
माझा एक शेतकरी मित्र टोमॅटोला ‘विषाचा गोळा’ म्हणतो; कारण टोमॅटो पिकावर अनेक वेळा, म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा विषारी रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आले, काकडी, कोबी, फ्लॉवर इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्षे, सफरचंद यांसारख्या फळांचेही थोड्याफार फरकाने असेच असते.
२. रसायन उत्पादन करणाऱ्या नफेखोर आस्थापनांच्या गल्लाभरू वृत्तीमुळे प्रतिदिन नाईलाजाने जनतेच्या पोटात विष जाणे
रसायन उत्पादन करणारी नफेखोर आस्थापने आणि त्यांचे गावोगावचे प्रतिनिधी अन् विक्रेते हे रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आणून देणारे लोकशिक्षणाचे कार्य करत नाहीत; कारण शेतकरी जागृत झाला, तर अशा आस्थापनांच्या नफ्यावरच टाच येईल. त्यामुळे नाईलाजाने हे विष प्रतिदिन जनतेच्या पोटात जात आहे.
३. हानीकारक रसायने आणि जनुकीय पालट केलेली बियाणे यांच्यामुळे निर्माण झालेली धोकादायक स्थिती
कीटकनाशकांच्या जोडीला तणनाशकांचा वाढता वापर आणि जी.एम्. बियाणे (जनुकीय पालट केलेली बियाणे) या दोन गोष्टी आल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. याची वानगीदाखल २ उदाहरणे –
अ. वर्ष २००० ते २००९ या काळात जनुकीय पालट केलेले खाद्यान्न आणि तणनाशके यांमुळे अर्जेंटिना या देशात शासन निष्कर्षानुसार बालकांमध्ये कर्करोग तिपटीने वाढला.
आ. रासायनिक खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांच्या अवशेषांमुळे पंजाबमधील भटिंडा अन् बटाला या परिसरांतील एकाही विहिरीचे पाणी पिण्यायोग्य उरलेले नाही. (महाराष्ट्राची वाटचालसुद्धा पंजाबच्या दिशेने होत आहे. अशा परिस्थितीत शेजारच्या नैसर्गिक शेतांमधील भूजलसुद्धा दूषित होणारच. म्हणून यापुढे एकट्या-दुकट्याने नव्हे, तर सर्वांनी विषमुक्त शेती करणे आवश्यक आहे. – संकलक)
४. रासायनिक शेतीमुळे भूमी वांझ होण्याच्या मार्गावर !
‘सर्वांच्या भरण-पोषणासाठी रासायनिक शेती लागणारच. नैसर्गिक शेती केल्यास लोक उपाशी मरतील’, असा प्रचार विविध माध्यमांमधून केला जात आहे. हा प्रचार लोकांमध्ये अपसमज पसरवणारा आहे; कारण नैसर्गिक शेतीने रासायनिक शेतीचे उच्चांक मोडल्याचीही अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. नैसर्गिक शेतीमुळे भूमी प्रतिवर्षी सुपीक होत जाते, तर रासायनिक शेतीत याच्या नेमके उलट घडते. रासायनिक शेती चालूच ठेवल्यास पुढच्या पिढ्यांच्या हातात आम्ही कशा प्रकारची भूमी सोपवू ? ती भूमी पूर्णपणे वांझ तर नसेल ?
५. कर्करोगासारख्या व्याधींना आमंत्रण देणारी तणनाशके
आपल्या देशात ‘तणनाशके सुरक्षित आहेत’, असा प्रचार करून ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. ‘ती वापरण्याखेरीज पर्याय उरणार नाही’, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. जगभरातील ८० पेक्षा अधिक वैज्ञानिकांच्या गटाने ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. या गटाने तणनाशकांच्या घातक परिणामांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ग्लायफोसेट तणनाशकाचे वर्गीकरण ‘संभाव्य कर्करोगकारक’ असे केले आहे. ‘ग्लायफोसेट’च्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने केवळ कर्करोगच नव्हे, तर वांझपण, नपुंसकता, गर्भपात, जन्मजात दोष, संप्रेरकांमध्ये (‘हार्मोन्स’मध्ये) पालट, मूत्रपिंडाचे विकार असे अनेक रोग होण्याची शक्यता असते. ग्लायफोसेटमुळे संपूर्ण अन्नसाखळीलाच बाधा पोचते. पिके आणि भूमी यांना अन्नद्रव्य पुरवणारे सूक्ष्म जीव, जलचर, उभयचर, मधमाश्या, पक्षी, सस्तन प्राणी आणि मानवी शरिरातील सूक्ष्म जीव यांवर घातक परिणाम होतो.
६. शेतीतील रसायने अन्नसाखळीत शिरून पूर्ण परिसंस्थेलाच मारक ठरत असणे
‘शेतात विष घातल्यानंतर ते अन्न आणि पाणी यांत येणारच. गिधाडांपासून गांडुळांपर्यंतचे सर्व जीव बाधित होणारच’, याचे भान प्रत्येकाला असायला हवे. आज मी भूमीत विष ओतत आहे. शेती म्हणजे साप, विंचू, गांडुळे, मुंग्या, मुंगळे, भूमीतील सूक्ष्म जीव, मासे, खेकडे, बेडूक, पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (इको सिस्टिम) आहे. या परिसंस्थेला बाधा पोचली की, सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातील नाही.
– श्री. वसंत फुटाणे, विषमुक्त सेंद्रिय शेतकरी, अमरावती.