नैसर्गिक शेतीचा प्रयोग यशस्वीपणे कार्यान्वित करणारे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत !

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाविद्यालयाच्या शेतातील एक कामगार कीटकनाशकाच्या वासाने बेशुद्ध पडल्यावर ‘रासायनिक शेती ही विषयुक्त शेती असून ती चुकीची आहे’, याची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. अशा घटना वारंवार घडतात, हे सर्व शेतकऱ्यांना ठाऊक आहे. त्या दिवशी राज्यपालांच्या मनात एक विचार आला, ‘ज्या कीटकनाशकाच्या नुसत्या वासाने कर्मचारी बेशुद्ध झाला, ते कीटकनाशक मी अन्नात घालून निष्पाप मुलांना देत आहे. याचा अर्थ मी मोठा अपराध करत आहे.’ त्या दिवसापासून ‘आता असे करायचे नाही’, असे त्यांनी ठरवले.

आचार्य देवव्रत

सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन घटणे

शेतीतील रसायनिक कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी त्यांनी कृषी शास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून सेंद्रिय शेतीला (गांडुळे आणि शेणखत यांची शेती) आरंभ केला; परंतु तिच्यामधून रासायनिक शेतीएवढे उत्पन्न न मिळाल्याने हानी होत आहे, त्यामुळे सेंद्रिय शेती सामान्य शेतकऱ्याला परवडणारी नाही, याची त्यांना जाणीव झाली. सेंद्रिय पद्धतीमुळे खर्च आणि परिश्रम झाले नाहीत, तरी उत्पादन मात्र घटले.

नैसर्गिक शेतीतून रासायनिक शेतीपेक्षा अधिक उत्पन्न येणे

याच कालावधीत त्यांची शेतीतज्ञ पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नैसर्गिक शेती करून पहायचे, असे देवव्रत यांनी ठरवले. त्यांनी श्री. पाळेकर यांना गुरुकुलात बोलावून ५०० शेतकऱ्यांसाठी ५ दिवसांचे शिबिर ठेवले आणि ‘नैसर्गिक शेती’ चालू केली. नैसर्गिक शेतीमधून पहिल्याच वर्षी रासायनिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाएवढे उत्पन्न आले. त्यानंतर त्यांचे उत्पन्न रासायनिक शेतीपेक्षाही अधिक येत आहे.

रसायनांच्या वापरामुळे भूमी नापीक होणे

३५ वर्षे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देत असलेली गुरुकुलाची भूमी त्यांनी रासायनिक खते वापरल्याने आता नापीक झाल्याने त्यांनी ती भाडेतत्त्वावर घेण्याचे नाकारले. शेतीतील हानीकारक रसायनांच्या वापरामुळे भूमीतील सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण पुष्कळ घटले होते. हरियाणातील कृषी विद्यापिठातील ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख असलेले डॉ. हरि ओम यांनीही प्रयोगशाळेत कार्बनचे प्रमाण ०.३ म्हणजे भूमी नापीक झाल्याचे सांगितले. (संपूर्ण देशात भूमीची हीच परिस्थिती आहे. रासायनिक शेतीतील युरिया, डीएपी, कीटकनाशके इत्यादींमुळे ज्यांच्यापासून सेंद्रिय कर्ब (कार्बन) निर्माण होतो, ती गांडुळे आणि जिवाणू मरतात.)

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार युरिया, डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट), फॉस्फरस, झिंक, पोटॅश ही रासायनिक द्रव्ये, तसेच हिरवळीचे खत मातीत घातल्याने पुढील २० ते ३० वर्षांत भूमी हळूहळू सुपीक होणार होती. त्यांची १०० एकर भूमी ज्यामुळे नापीक झाली होती, तेच करायला कृषी शास्त्रज्ञ सांगत होते. त्यामुळे आचार्य देवव्रत यांनी कृषीतज्ञांचा खर्चिक आणि वेळखाऊ पर्याय नाकारून नैसर्गिक पद्धतीने भूमी सुपीक करायचे ठरवले.

नापीक भूमी नैसर्गिक शेती पद्धतीनुसार ‘जीवामृत’ वापरून सुपीक करणे

नापीक झालेल्या भूमीतही जीवामृताच्या वापरामुळे पहिल्या वर्षापासूनच पुष्कळ उत्पन्न आले. शेतकऱ्यांनी त्यांची १०० एकर भूमी सोडली होती. त्यात काहीच सुपीकता उरली नव्हती. त्यात त्यांनी एकरी ५ क्विंटल घनजीवामृत (यात जीवामृत सुकवून सिद्ध केलेले असते) टाकून भात लावला. प्रत्येक वेळी पाण्यासह जीवामृत दिले आणि त्याची फवारणीही केली. २ मासांत भातशेती वाढू लागली आणि काढणी झाली. तेव्हा त्यांच्या भाताचे एकरी २६ ते २८ क्विंटल उत्पन्न आणि त्याच्या पुढच्या वर्षी सरासरी ३२ क्विंटल उत्पन्न आले. (१ क्विंटल म्हणजे १०० किलो) हे त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना दाखवल्यावर ते चकित होत म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे ? सेंद्रिय कर्ब अत्यल्प असलेली भूमी असतांना तिच्यात एवढे उत्पन्न ? हा तर चमत्कार आहे ! हे अनाकलनीय आहे. मी आतापर्यंत कृषीशास्त्राचा जो अभ्यास केला आहे, त्यानुसार असे होऊच शकत नाही. आता मी माझ्या शास्त्रज्ञांना बोलावून तुमच्या भूमीची पुन्हा तपासणी करून पहातो.’’ त्यांनी पुन्हा त्या भूमीचे शेकडो नमुने घेतले आणि विद्यापिठाकडे पाठवले. त्यांच्या अहवालानुसार एकाच वर्षानंतर त्यांच्या भूमीतील सेंद्रिय कर्बाचे (कार्बनचे) प्रमाण ०.३ वरून ०.८ पर्यंत वाढले होते. जेव्हा तो अहवाल समोर आला, तेव्हा ते आधीपेक्षा अधिकच चकित झाले. ते म्हणाले, ‘‘रासायनिक शेतीत सेंद्रिय कर्ब एका वर्षात एवढा वाढूच शकत नाही ! जगातील कोणताही शास्त्रज्ञ हे मान्य करणार नाही. हे खरोखर आश्चर्य आहे !’’ सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे काम शेतातील जिवाणू, गांडुळे आणि कीटक मित्र करत असतात. रासायनिक (कीटकनाशके आणि खते वापरलेल्या) शेतीमुळे हे जीवाणू मारले जातात. मग सेंद्रिय कर्ब कसा वाढणार ?

भारतीय वंशाच्या गायींच्या शेणाची गुणवत्ता अधिक चांगली असणे, हे संशोधनाने सिद्ध होणे

डॉ. हरि ओम आणि डॉ. सारंग हे हिस्सार कृषी विद्यापीठ, हरियाणा येथील सूक्ष्मजीवशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक त्यांच्या सहकाऱ्यांसह देवव्रत यांच्या गुरुकुलात आले आणि त्यांनी जीवामृतावर संशोधन केले. त्यांनी देशी गाय, म्हैस, तसेच ‘जर्सी’ आणि ‘होल्स्टीन फ्रीजियन’ या विदेशी गायींच्या शेणांचे नमुने घेऊन अनेक मास संशोधन केले. त्यात त्यांना आढळून आले की, देशी गायीच्या १ ग्रॅम शेणामध्ये शेतीसाठी उपयुक्त असे ३०० कोटींहून अधिक सूक्ष्म जीवाणू असतात. साहिवाल, थारपारकर, राठी, गीर, हरियाणवी, लाल सिंधी, कांकरेज, ओंगल इत्यादी सर्वच भारतीय वंशाच्या गायींच्या शेणाची गुणवत्ता जवळजवळ सारखीच असते; परंतु विदेशी वंशाच्या गायी आणि म्हशी यांच्या शेणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त जीवाणू नसतात. ‘देशी गायींचे मूत्र हे खनिजांचे भांडार आहे’, असेही त्यांना संशोधनात आढळून आले. श्री. पाळेकरगुरुजींनी असे संशोधन अनेक वेळा केल्यामुळे एक पूर्ण सत्य जगासमोर आले.

गांडुळादी भूमीतील सूक्ष्म जीवाणूंनी वनस्पतींसाठी अन्न निर्माण करणे

भूमीमध्ये फॉस्फरस, यशद (झिंक), पोटॅश, तांबे यांसारखे अनेक खनिज घटक असतात; परंतु हे घटक स्वतःहून वनस्पतीला अन्न म्हणून उपलब्ध होत नाहीत. गांडूळ, तसेच भूमीतील सूक्ष्म जीवाणू त्या घटकांपासून अन्न निर्माण करतात आणि ते वनस्पतींच्या मुळांना देतात. याचाच अर्थ शेतीत जितके सूक्ष्म जीवाणू असतील, तितके सेंद्रिय कर्ब वाढते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जेवढे वाढते, तेवढे भूमीचे आरोग्य चांगले रहाते. भूमीचे आरोग्य जितके चांगले, तितके उत्पन्न वाढते.

भारतीय गांडुळांचे वैशिष्ट्य !

युरिया, डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) यांसारख्या रासायनिक खतांच्या वापरामुळे गांडूळ घाबरतात आणि ते भूमीत १५ फूट खाली जाऊन लपतात. जेव्हा मातीत घनजीवामृत मिसळले जाते, तेव्हा त्याचा गंध भूमीत पसरतो. त्यामुळे हे गांडूळ पुन्हा वर येतात आणि त्यांचे कार्य चालू करतात. भारतीय गांडूळ शेण, काष्ठ (काडी-कचरा), तसेच मातीही खातात; मात्र सेंद्रिय शेतीत जे विदेशी गांडूळ वापरले जातात, ते माती खात नाहीत. केवळ शेण आणि काष्ठ खातात. हे विदेशी गांडूळ १६ अंश सेल्सिअसपेक्षा अल्प आणि २८ अंश सेल्सिअसच्या वरच्या तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. भारतीय गांडूळ मात्र हिमाच्छादित टेकड्यांपासून वाळवंटांपर्यंत एकसारखेच काम करतात. ही सर्व देवाची व्यवस्था आहे !

भारतीय गांडुळांपासून शेतीला होणारे लाभ

अ. गांडुळांच्या कार्यामुळे भूमीतील झाडांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांमध्ये वाढ होणे : गांडूळ भूमीत एक छिद्र करून थेट १० फुटांपर्यंत आत जातात आणि दुसऱ्या छिद्रातून वर येतात. जातांना ते छिद्र आपल्या घामाने (शरिरातून निघणाऱ्या विशिष्ट द्रव पदार्थाने) लिंपत जातात. त्यामुळे छिद्र लवकर बंद होत नाही. या छिद्रातून भूमीला प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. गांडूळ भूमीतील खनिजे खातात आणि विष्ठेच्या रूपात वनस्पतीच्या मुळांना आवश्यक घटक देतात. गांडुळांच्या विष्ठेत सामान्य मातीपेक्षा ५ पट अधिक नत्र (नायट्रोजन), ९ पट अधिक स्फुरद (फॉस्फरस) आणि ११ पट अधिक पालाश (पोटॅश) असते. (नत्र, स्फुरद आणि पालाश ही झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली भूमीतील मूलभूत द्रव्ये आहेत. – संकलक)

आ. गांडुळांच्या कार्यामुळे भूपृष्ठाखालील पाण्याच्या पातळीत वाढ होणे : जेव्हा नैसर्गिक शेती होते, तेव्हा त्या शेतात एकरी लक्षावधी गांडूळ असतात. ‘हे गांडूळ रात्रंदिवस कार्यरत रहातील, तर ते शेतकऱ्यासाठी फुकटात किती खत सिद्ध करत असतील’, याची कल्पना करा ! गंमत म्हणजे हे गांडूळ भूमीमध्ये एवढी छिद्रे निर्माण करतात की, ती मोजलीही जाऊ शकत नाहीत. पाऊस पडला की, पावसाचे पाणी या छिद्रांतून थेट भूमीच्या पोटात जाते आणि नैसर्गिकपणे जलसंधारण होते. जलसंधारणासाठी आपण कोट्यवधी रुपये व्यय करत असतो; पण गांडूळ हे कार्य फुकटात करतात. ही नैसर्गिक शेती सर्वच ठिकाणी केली, तर पावसाचे पाणी भूमीत चांगल्यारितीने साठवले जाईल आणि भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. असे हे एक आश्चर्य आहे !

जीवामृत बनवण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र !

एक एकर शेतीसाठी लागणारे जीवामृत बनवण्यासाठी २०० लिटरचे पिंप घ्यावे. पिंप सावलीत ठेवून त्यात सुमारे १८० लिटर पाणी भरावे. त्यात दीड ते २ किलो गूळ, कोणत्याही डाळीचे दीड ते २ किलो पीठ, १ मूठ माती, देशी गायीचे १० किलो शेण, तसेच देशी गायीचे १० लिटर मूत्र हे सर्व मिसळून त्या पाण्यात सोडावे. विचार करा, १ ग्रॅम शेणात ३०० कोटी जीवाणू असतात, तर १० किलो शेणात किती जीवाणू असतील ! या जिवाणूंना डाळीच्या पिठाच्या रूपात प्रथिने मिळतात. यामुळे ते बलवान होतात. गुळामुळे त्यांना ऊर्जा मिळते आणि त्यांची संख्या वाढत जाते. मातीत असलेल्या जीवाणूंशी संपर्क आल्यावर प्रत्येकी २० मिनिटांनी त्यांची संख्या दुप्पट होते. ७२ घंट्यांत ते असंख्य प्रमाणात वाढतात आणि १ एकर भूमीसाठीचे खत सिद्ध होते. देशी गायीचे एका दिवसाचे शेण आणि मूत्र यांपासून १ एकर शेतीसाठीचे जीवामृत सिद्ध होते. जेव्हा ते शेतातील जीवाणूंशी संयोग पावते, तेव्हा ते विरजणाचे काम करते. त्यापासून असंख्य जीवाणू सिद्ध होतात. हे जीवाणू हवेतील ७८ टक्के नत्र (नायट्रोजन) खेचून घेऊन झाडाला अन्न म्हणून उपलब्ध करून देतात.

– आचार्य देवव्रत

आचार्य देवव्रत आणि त्यांचे सहकारी यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी केलेले कार्य !

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यपाल असतांना आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून नैसर्गिक शेतीविषयीची मोहीम चालू केली. २ वर्षांत शासनाचे सहकार्य घेऊन ५० सहस्र शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती चळवळीशी जोडले. प्रबोधनानंतर २ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले अन् त्यांनी ‘आम्ही या राज्यात ही चळवळ यशस्वीपणे राबवू’, असे आश्वासन त्यांना दिले. हिमाचल प्रदेशमधील नौनी येथील कृषी विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी त्यांच्यानंतर ही परंपरा थांबू दिली नाही आणि आज हिमाचल प्रदेशात दीड लाखांहून अधिक शेतकरी अन् बागायतदार नैसर्गिक शेती करत आहेत, तसेच त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे आणि पाण्याचा वापर न्यून झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शरिरांवर रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे दुष्परिणाम होत असत, ते आज ही फवारणी करावी लागत नसल्याने आनंदी आहेत.

आंध्रप्रदेशचे मुख्य सचिव टी. विजयकुमार यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील ५ लाख शेतकऱ्यांना जोडले. या भागात जिथे पाणी नाही, तिथे ते या नैसर्गिक शेतीतून आता वर्षाकाठी ३ पिकेही घेता येत आहेत. त्यांनी या प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रज्ञांना, तसेच असंख्य शेतकऱ्यांना जोडले. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचे शोधनिबंध सिद्ध आहेत. कोरोनाच्या काळातही आम्ही गुजरातमध्ये २ लाख शेतकऱ्यांचे संघटन केले. येथील शेतकऱ्यांकडे २ लाख देशी गायी पोचवल्या असून गुजरात राज्यातील ‘डांग’ हा जिल्हा भारतातील पहिला १०० टक्के नैसर्गिक शेती असणारा जिल्हा झाला आहे.

नैसर्गिक शेतीतील आच्छादन तंत्र आणि त्याचे लाभ !

१. नैसर्गिक शेतीचा आणखी एक महत्त्वाचा भाग, म्हणजे ‘आच्छादन’. शेतातील गवत कापून ते शेतात पसरायचे. दोन रोपांमध्ये रिकामी जागा न सोडता त्यात गवत पसरा. याला ‘आच्छादन’ म्हणतात. गवताचे आच्छादन वातावरणातील पाण्याचा अंश खेचून घेते आणि भूमीचा ओलावा टिकवून ठेवते. यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये ५० टक्के पाण्याचा वापर न्यून होतो.

२. पृथ्वीचे तापमान ३५ अंश सेल्सिअस असते, तेव्हा मातीतील सेंद्रिय कर्ब मोकळा होऊन हवेत पसरतो आणि तो तापमानवाढीला कारण ठरतो. भूमी गवताने झाकल्यामुळे सेंद्रिय कर्ब भूमीतच रहातो आणि भूमीची सुपीकता वाढते.

– आचार्य देवव्रत