भाजीपाला लागवडीसाठी वाफे (कप्पे) कसे बनवावेत ?

घरच्या घरी लागवड करण्यासाठी ज्या भागात दिवसभरातून न्यूनतम ३ – ४ घंटे ऊन मिळते, अशी जागा निवडावी. या ठिकाणी लागवडीसाठीच्या कुंड्या ठेवाव्यात किंवा विटांचे वाफे (कप्पे) बनवून घ्यावेत. वाफ्यांची रुंदी २ फुटांपर्यंतच ठेवावी. यामुळे वाफ्यांमध्ये लागवड करणे सोपे जाते. विटेची जेवढी रुंदी असते, तेवढ्या उंचीचे, म्हणजे साधारण ४ इंच उंचीचे वाफे पुरेसे होतात. यामुळे आगाशीला मातीचा जास्त भार होत नाही. ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्ये झाडाला पुष्कळ अल्प पाणी द्यावे लागत असल्याने वाफ्यांच्या खाली प्लास्टिक अंथरण्याची आवश्यकता नाही, तरीही पाणी खाली झिरपण्याची धाकधुक वाटत असल्यास भूमीवर प्लास्टिक अंथरून त्यावर विटांचे वाफे बनवावेत. (विटांच्या वाफ्यासाठी सनातनच्या संकेतस्थळावरील व्हिडिओ पहा. लिंक https://www.sanatan.org/mr/a/82985.html)

वाफ्यांमध्ये नैसर्गिक कचरा पसरून त्यावर आठवड्यातून एकदा जीवामृत शिंपडणे

आपण ज्यांमध्ये लागवड करणार असू, त्या कुंड्या किंवा विटांचे वाफे यांमध्ये वाळलेला नैसर्गिक कचरा (उदा. नारळाच्या शेंड्या, वाळलेले गवत, पालापाचोळा) अंथरून दाबून घ्यावा. यावर उपलब्ध असल्यास थोडी माती पसरवून टाकावी. माती नाही टाकली, तरी चालते; परंतु माती टाकल्यास कचऱ्याचे विघटन लवकर होते. यावर स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचा १ इंचाचा थरही देता येतो; मात्र ओल्या कचऱ्याचा थर १ इंचापेक्षा जास्त नसावा; कारण असे झाल्यास दुर्गंध पसरू शकतो. देशी गायीच्या शेणामध्ये नैसर्गिक कचऱ्याचे विघटन करणारे जीवाणू असतात. या शेणापासून ‘जीवामृत’ नावाचा पदार्थ बनवला जातो.

– एक कृषीतज्ञ, पुणे (८.१२.२०२१)