गोव्यात १२ जूनपासून दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स प्रारंभ !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्र संसद’ हे यंदाच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य !

नवी देहली – गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राच्या चर्चेस प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी दिली.

देहली येथील ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ येथेआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘हिंदु इकोसिस्टम’चे संस्थापक अध्यक्ष श्री. कपिल मिश्रा आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री हे मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून श्री. कपिल मिश्रा, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि कु. कृतिका खत्री

यंदाच्या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील ३ दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि राज्यघटनात्मक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा ?’ या विषयांवर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे, अशीही माहिती सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी दिली.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कायद्यांना विरोध करण्यासाठी इसलामची ढाल पुढे करणे, आता चालणार नाही ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. नुकतेच ‘जमियत उलमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांनी ‘समान नागरी कायद्याच्या आधारे शरियत कायद्यात हस्तक्षेप चालणार नाही. हिंदूंना मुसलमान आवडत नसतील, तर हिंदूंनी भारत सोडून निघून जावे’, असे उघडपणे धमकावले. मुसलमानांनी हिंदूंना धमकावून त्यांना काश्मीरमधून बाहेर काढले, आता उर्वरित हिंदूंना भारतातून बाहेर काढण्यासाठी त्यांची ही धमकी आहे. एकीकडे ‘आम्ही पाकिस्तानात गेलो नाही’, असे अभिमानाने सांगायचे आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटनेच्या आधारे बनलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी इस्लामची ढाल पुढे करायची, हे यापुढे चालणार नाही. मुसलमान पाकिस्तानात न जाता भारतात राहिले, हे त्यांनी भारतावर केलेले उपकार नाहीत. आज पाकिस्तानात गेलेल्यांची स्थिती काय आहे, हे त्यांनी पहावे. भारतातील बहुसंख्य हिंदूंनी मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या विशेष सवलती देऊनही बंधुभाव जोपासला आहे, हे लक्षात घ्यावे. आताचा भारत गांधीगिरी करणारा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून स्वराज्यरक्षण करणारा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

२. कोरोनामुळे गेली २ वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. यावर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी आणि नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १ सहस्राहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ (धार्मिक स्थळ कायदा), ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट : एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’ हा धर्मनिरपेक्षेतेच्या सिद्धांतांचे उल्लंघन करणारा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

काशी येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी न्यायालयीन संघर्ष करणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’ हा धर्मनिरपेक्षेतेच्या सिद्धांतांचे उल्लंघन करणारा आहे. या कायद्याने न्यायालयाचे दार ठोठावण्याचा अधिकारही हिरावून घेतला आहे. याउलट ‘वक्फ कायद्या’ने मुसलमानांना कोणतीही संपत्ती ‘वक्फ संपत्ती’ घोषित करण्याचा अधिकार दिला. वक्फ कायद्यातील तरतूद भारताच्या राज्यघटनेच्या कलम १४ आणि १५ नुसार भेदभावपूर्ण अन् घटनेच्या कलम २५ अन् २६ यांद्वारे हिंदूंना दिलेल्या धार्मिक अधिकाराचे उल्लंघन करते.

श्री. कपिल मिश्रा

या अधिवेशनातून हिंदूंचे संघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती मिळेल ! – श्री. कपिल मिश्रा

‘हिंदु इकोसिस्टम’चे संस्थापक अध्यक्ष श्री. कपिल मिश्रा म्हणाले की, आम्ही हिंदू विचारांना गती देणे, युवा पिढीला सनातन धर्माविषयी माहिती देणे, तसेच हिंदु दर्शन, चिंतन यांवर होणार्‍या वैचारिक आक्रमणांचे खंडन करण्याचे काम करतो. यांसह आमच्या देवता, श्रद्धा यांचा अवमान करणे, हिंदूंच्या भावना दुखावणे यांनाही आंदोलनांच्या माध्यमातून विरोध करत धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांतून येणारे अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, धार्मिक संस्था आणि संत-महंत यांच संघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला निश्‍चितच गती प्राप्त होईल.

कु. कृतिका खत्री

हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी अधिवेशन दिशादर्शक ठरेल ! – कु. कृतिका खत्री

सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सुश्री (कु.) कृतिका खत्री म्हणाल्या की, केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे श्रीराममंदिर निर्माण, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधातील कायदे लागू होणे, कलम ३७० हटवणे आदींविषयी सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे शेष आहे. ओवैसी ‘बाबरी घेतली; पण ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. देशभर हिंदूंच्या मिरवणुका तथा धार्मिक उत्सवांवर आक्रमणे होत आहेत. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बलपूर्वक होणार्‍या धर्मांतरामुळे ‘लावण्या’सारख्या हिंदु मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला ३२ वर्षे होऊनही काश्मिरी हिंदूंच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. एकूणच हिंदू सर्वत्र असुरक्षित आहे. त्यामुळे हिंदूंनी घटनात्मक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल.

अधिवेशनाला उपस्थित रहाणारे मान्यवर !

या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्‍वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील आमदार आणि ‘हिंदु शेर’ म्हणून प्रख्यात असलेले टी. राजासिंह, हिंदुत्वनिष्ठ ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, ‘पनून कश्मीर’चे श्री. राहुल कौल, झारखंड येथील ‘तरुण हिंदु’ संघटनेचे अध्यक्ष श्री. नील माधव दास, तमिळनाडू येथील ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता दल) पक्षाचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, गोव्यातील ‘भारतमाता की जय’ संघटनेचे संस्थापक श्री. सुभाष वेलिंगकर, अरुणाचल प्रदेश येथील ‘बांस संसाधन आणि विकास एजन्सी’चे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई, ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिरांचे विश्‍वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. यासह या अधिवेशनाला ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंदजी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही लाभणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण !

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ३० हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी समर्थन पत्रे दिली आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि @HinduJagrutiOrg या ट्विटर खात्याद्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.