५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. ज्ञानराज परेश चौखंडे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ज्ञानराज परेश चौखंडे हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. ज्ञानराज चौखंडे

चि. ज्ञानराज परेश चौखंडे याचा नुकताच पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई सौ. आश्लेषा चौखंडे आणि आजी (आईची आई) सौ. विजया प्रकाश व्यवहारे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. गर्भधारणेपूर्वी

१ अ. आधुनिक वैद्यांनी ‘गर्भधारणेत अडचण आहे’, असे सांगणे, पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत) यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला सांगणे : ‘मला असलेल्या काही शारीरिक अडचणींमुळे आधुनिक वैद्यांना भेटायला गेले असता ते म्हणाले, ‘‘तुमच्या दोन अंडकोषांपैकी एकाचा आकार फार लहान आहे. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची वाट न पहाता आधुनिक वैद्यकीय उपचार करून घ्या.’’ माझी आई सौ. विजया व्यवहारे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. तिने माझी अडचण पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत) यांना सांगितली. तेव्हा त्यांनी मला ‘कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्याचा निरोप दिला. मी फेब्रुवारी २०२० पासून हे नामजप करायला आरंभ केला.’ – सौ. आश्लेषा चौखंडे, (बाळाची आई) अकोला

१ आ. अनुभूती – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असतांना त्यांनी ‘तुम्ही आजी होणार’, असे सांगणे : ‘२०.६.२०२० या दिवशी नामजप करत असतांना मी प.पू. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात होते. त्यांच्याशी संवाद साधतांना ते मला म्हणाले, ‘तुम्ही आता आजी होणार.’ मला आनंद झाला. मी कुतूहलाने विचारले, ‘मुलगा होणार कि मुलगी ?’ तेव्हा ते म्हणाले, ‘मुलगा.’ मला पुष्कळ आनंद झाला. काही दिवसांनी माझ्या मुलीने ती गरोदर असल्याचे मला सांगितले.’ – सौ. विजया प्रकाश व्यवहारे (आजी, बाळाच्या आईची आई), अकोला

२. गर्भधारणेनंतर

सौ. आश्लेषा चौखंडे

२ अ. गरोदरपणातील पहिले ५ मास हिमाचल प्रदेशात असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मन सकारात्मक असणे : ‘जुलै २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी गरोदर असल्याचे मला कळले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. यजमानांच्या चाकरीमुळे मी गरोदरपणातील पहिले ५ मास हिमाचल प्रदेशात होते. तिथेही ‘गुरुमाऊली माझी सर्व काळजी घेत होती’, असे मी अनुभवत होते. त्यामुळे मी सकारात्मक होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करतांना गर्भाने प्रतिसाद देणे : गरोदर असतांना मी पोटावर हात ठेवून गुरुमाऊलीला प्रार्थना करायचे, ‘हे गुरुमाऊली, हे बाळ श्रीकृष्णाप्रमाणे सुंदर, प्रेमळ आणि कृष्णनीतीत पारंगत असू दे. मारुतिरायाप्रमाणे बलवान आणि देवाचा परम भक्त असू दे. श्रीरामाप्रमाणे कमलनयनी आणि चारित्र्यसंपन्न होऊ दे. गणपतीप्रमाणे बुद्धीमान असू दे.’ मी या प्रार्थना करतांना मला पोटात ‘गर्भाची हालचाल जाणवून गर्भ प्रतिसाद देत आहे’, असे जाणवत असे.

२ इ. गर्भामुळे सकारात्मक रहाण्यास साहाय्य होणे : माझ्या मनात कुणाविषयी प्रतिक्रियात्मक वाईट विचार आले, तर गर्भाची एकदम वेगळीच हालचाल व्हायची. तेव्हा ‘मी सकारात्मक रहायला हवे’, याची मला जाणीव व्हायची.

२ ई. रामरक्षा, मारुतिस्तोत्र किंवा सत्संग ऐकतांना ‘गर्भही ते ऐकत आहे’, असे मला जाणवायचे.’

– सौ. आश्लेषा चौखंडे

३. प्रसुती

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवळून प्रार्थना केल्यावर बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या होणे : ‘मुलीला बाळंतपणाच्या वेळी नैसर्गिक प्रसुती होण्यात अडचण येत होती. शेवटी आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यासाठी मुलीला पटलावर घेतले. ते मला म्हणाले, ‘‘बाळ आणि आई या दोघांची स्थिती गंभीर आहे. आईला वाचवणे महत्त्वाचे आहे. आपण प्रयत्न करू.’’ ते ऐकून मला पुष्कळ ताण आला. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवळून प्रार्थना केली. मुलीनेही भवानीमातेला प्रार्थना केली आणि चमत्कार झाल्याप्रमाणे शस्त्रकर्म न करता बाळाचा नैसर्गिकरित्या जन्म झाला. बाळाला ५ दिवस अतीदक्षता कक्षात ठेवावे लागले. तेथेही परात्पर गुरु डॉक्टरांनी बाळाची काळजी घेतली.

४. वय जन्म ते ५ मास

सौ. विजया व्यवहारे

४ अ. नामकरण सोहळ्याच्या वेळी बाळ रडत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर बाळ शांत होणे : बाराव्या दिवशी बाळाला पाळण्यात घालण्याचा सोहळा चालू होता. तेव्हा काही बाह्य कारण नसतांना बाळ सतत रडत होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच याला शांत करा.’ त्यानंतर बाळ शांत झाले. बाळाचे नाव ‘ज्ञानराज’ ठेवले.

गुरुमाऊलीची कृपा मी सातत्याने अनुभवत आहे. त्यामुळे माझा गुरुमाऊलीच्या प्रती कृतज्ञताभाव वाढत आहे.’

– सौ. विजया प्रकाश व्यवहारे

४ आ. ‘ज्ञानराज हाताचा अंगठा आणि तर्जनी यांची टोके जोडून तो हात कपाळावर ठेवून झोपतो.

४ इ. देवाची ओढ

१. माझी आई गुरुवारचा भाववृद्धी सत्संग त्याला मांडीवर घेऊन नियमित ऐकायची. कधी ज्ञानराज रडायला लागला, तर ती त्याला म्हणायची, ‘‘तूही भावसत्संग ऐक.’’ तेव्हा तो शांत होऊन सत्संग ऐकायचा. रामनवमीच्या दिवशी तो सारखा रडत होता. तेव्हा आईने श्रीरामाचा नामजप आणि रामजन्माचा पाळणा लावल्यावर ते ऐकत तो शांतपणे झोपला.

२. ज्ञानराजचे जावळ काढण्याच्या दिवशी तो सतत रडत होता. तेव्हा काही वेळ दत्त आणि विठ्ठल यांचे नामजप लावल्यावर तो रडायचा थांबला.

५. वय ६ ते ९ मास

अ. ‘ज्ञानराजला ‘वॉकर’मध्ये ठेवल्यावर तो सरळ देवघरात जातो आणि देवाकडे पहात रहातो.

आ. ज्ञानराजचे केस मुळाशी सोनेरी होत आहेत.

इ. अनुभूती – ‘श्रीसत्‌शक्ति बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ज्ञानराजला चैतन्य देऊन अन् अंगाई गीत म्हणून झोपवत असून ज्ञानराज शांत झोपला आहे’, असे दिसणे : एक दिवस ज्ञानराज झोपत नव्हता. मी थकले होते; म्हणून मी डोळे मिटून परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करू लागले. तेव्हा  ‘श्रीचित्‌‌शक्ति अंजलीताईंनी ज्ञानराजला मांडीवर घेतले असून त्या ज्ञानराजच्या डोक्यावर हात ठेवून त्याला चैतन्य पुरवून आणि श्रीसत्‌शक्ति बिंदाताई अंगाईगीत म्हणून त्याला झोपवत आहेत’, असे मला दिसले. मी डोळे उघडून पाहिले, तर ज्ञानराज गाढ झोपला होता. मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

६. स्वभावदोष

हट्टीपणा आणि राग येणे’

– सौ. आश्लेषा चौखंडे (सर्व सूत्रांचे दिनांक १६.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.