सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवांसाठी दादर येथील एका विद्यालयाच्या परिसरात सेवाकेंद्र उभारण्यात आले होते. मी ४ दिवस या सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले होते. तेथे यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना, तसेच यज्ञाच्या दिवशी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री राजमातंगी महायज्ञ

१. महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना

सौ. सविता शिंदे

१ अ. शारीरिक कष्टांची जाणीव न होता आनंद आणि चैतन्य जाणवणे : या ४ दिवसांत मला दिवसभर सेवा असायची. मला काही शारीरिक आजार आहेत; परंतु या वेळी सेवा करतांना मला कोणतेही शारीरिक त्रास जाणवले नाहीत. सेवा करतांना मला आध्यात्मिक लाभ होत होते. दिवसभर सर्वत्र आनंद आणि चैतन्य जाणवत होते.

१ आ. स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णामातेची मूर्ती हसतांना दिसून भावजागृती होणे : सेवाकेंद्रातील स्वयंपाकघरात सेवा करतांना ‘श्री अन्नपूर्णामातेची मूर्ती आपल्याकडे बघून हसत आहे’, असे २ साधकांना दिसले. मी मूर्तीकडे पाहिले, तेव्हा मलाही तसेच जाणवले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.

२. यज्ञाच्या दिवशी

अ. यज्ञाच्या दिवशी सकाळपासून माझ्या मनाला यज्ञाचा ध्यास लागला होता. यज्ञस्थळी पोचल्यानंतर ‘शब्दांत सांगता येणार नाही’, असा आनंद मला होत होता.

आ. यज्ञाच्या वेळी पुरोहित मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. माझे मन श्री राजमातंगीदेवीच्या चरणी सतत अर्पण होत होते. यज्ञ केव्हा पूर्ण झाला, हे मला कळलेही नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या चैतन्याचा लाभ झाला. त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. सविता शिंदे, बेलापूर, नवी मुंबई. (२२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक