जगात फाशी देणार्‍या देशांच्या सूचीत चीन आघाडीवर ! – अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल

प्रातिनिधिक छायाचित्र

न्यूयॉर्क – ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा देणार्‍या देशांच्या सूचीत चीन आघाडीवर आहे. वर्ष २०२१ मध्ये जगभरात दिलेल्या एकूण फाशीच्या शिक्षांपैकी ८० टक्के फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये देण्यात आली आहे. वर्ष २०२२ मध्येही फाशी देण्याच्या घटनांमध्ये चीन, तसेच इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये कोणतीही घट झाली नाही. अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॅलामार्ड म्हणाले, ‘‘आमची संघटना सर्व प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेचा निषेध करते. फाशी देणे, हे प्रामुख्याने अल्पसंख्य आणि उपेक्षित समुदायांना प्रभावित करणारे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.’’

१. या संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, या आकडेवारीमध्ये चीन, उत्तर कोरिया आणि व्हिएतनाम या देशांतील आकडेवारी समाविष्ट नाही; कारण हे देश गुन्हेगारांना फाशी आणि फाशीच्या शिक्षेशी संबंधित माहिती देत नाहीत; मात्र संघटनेला चीनमधील फाशीच्या घटनांविषयी प्राप्त माहितीवरून चीनविषयी मत नोंदवण्यात आले आहे.

२. गेल्या २ वर्षांत जगभरात गुन्हेगारांना फाशी देण्याच्या घटनांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे, तर फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या संख्येत ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३. वर्ष २०२० मध्ये जगभरात ४८३ गुन्हेगारांना फाशी देण्यात आली, तर १ सहस्र ४७७ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

४. वर्ष २०२१ मध्ये जगभरात ५७९ गुन्हेगारांना फाशी देण्यात आली, तर २ सहस्र ५२  गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

५. विविध देशांमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जगातील ८० टक्के फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये दिली गेली. इराणमध्ये वर्ष २०२१ मध्ये ३१४ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली, तर वर्ष २०२० मध्ये २४६ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.