सांगली येथील विनयभंग झालेल्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे !

तक्रारदार महिलेवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – सांगली येथील उपवनसंरक्षक विजय माने यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले आहे. ‘१ वर्षापूर्वी मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. आता दुसऱ्या आत्महत्येची वाट आपण पहात आहात का ?’, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

१. उपवनसंरक्षक विजय माने यांच्या विरोधात सांगली वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्याने कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात १२ दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार दिली आहे. यानंतर वनविभागाने माने यांचा कार्यभार काढून घेतला; मात्र ते मुख्यालयात कायम आहेत. त्यामुळे ते कार्यालय परिसरातून तक्रारकर्त्या अधिकारी महिलेवर मानसिक दबाव आणतात.

२. १५ मे या दिवशी कडेगाव (जिल्हा सांगली) येथील निवासस्थानी तोंडवळा झाकलेल्या एका व्यक्तीने त्यांना ‘माने यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्या, अन्यथा तुमची नोकरी जाईल’, अशी धमकी दिली. त्या अज्ञात व्यक्तीने प्राणघातक आक्रमण करण्याची चेतावणीही दिली. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने पुन्हा तक्रार प्रविष्ट केली; मात्र वनविभागाकडून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

३. या प्रकरणात विजय माने यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मान्य केला. त्यावर १८ मे या दिवशी पुन्हा सुनावणी झाली असता ३० मेपर्यंत अंतरिम जामीन वाढवण्यात आला.

४. ‘मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनविभागाची यंत्रणा थोडीफार सक्रीय झाली होती. याप्रकरणी तत्कालीन उपवनसंरक्षकांना निलंबित करण्यात आले. हीच वेळ आपल्यावर येऊ नये; म्हणून पोलिसात तक्रार करून न्याय मागण्याचा पर्याय मी निवडला. संबंधित अधिकाऱ्याकडून मी आणि माझे कुटुंबीय यांच्या जिवाला धोका आहे. वन विभाग माझ्या संयमाची परीक्षा घेत आहे. शेवटची अपेक्षा म्हणून आपल्याला पत्र लिहीत आहे. यानंतरही न्याय मिळाला नाही, तर महिला अधिकारी वन विभागात काम करण्यास धजावणार नाहीत’, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

५. ‘या प्रकरणी संबंधित उपवनसंरक्षकाला तातडीने निलंबित करणे अपेक्षित होते. माने यांचे मुख्यालयातून नागपूर येथे स्थानांतर करण्यात यावे आणि महिला अधिकाऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू’, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • मेळघाटातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ताजे असतांना विनयभंग झालेल्या महिलेने तक्रार केल्यानंतरही चौकशी करून उपवनसंरक्षकांवर कारवाई का केली जात नाही ? यामध्ये काही साटेलोटे तर नाही ना ?
  • महिलेवर मानसिक दबाव आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.
  • महिला वनअधिकाऱ्याच्या विनयभंगाकडे गांभीर्याने न पहाणारे प्रशासन सामान्य महिलांना काय न्याय देणार ?