महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद यांची सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासना देवी मंदिराचे महंत आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद गिरि यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. ‘आता पुढचे जीवन केवळ धार्मिक कार्यासाठी व्यतित करणार’, असेही त्यांनी म्हटले आहे. जिहादच्या विरोधातील लढाई आणि धर्म संसदेचे आयोजन यांच्यापासून स्वतःला वेगळे केल्याचेही त्यांनी या वेळी घोषित केले.

यति नरसिंहानंद यांनी व्हिडिओ प्रसारित करून मांडलेली सूत्रे

१. जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या विरोधात धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधान केल्याने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांची आता जामिनावर सुटका झाली आहे; मी त्यांना भेटण्यापूर्वीच ते कारागृहातून निघून केले. त्यांच्या अटकेला मीच पूर्णतः दोषी आहे. त्यांनी सत्य तेच सांगितले होते. माझ्या दुर्बलतेमुळे त्यांना ४ मास कारागृहात रहावे लागले. यासाठी मी त्यांची क्षमा मागतो. तसेच माझ्याकडून आतापर्यंत झालेल्या चुकांसाठी मी हिंदूंची क्षमा मागतो.

२. वर्ष २०१२ मध्ये देवबंदच्या इस्लामी जिहादच्या विरोधात धर्मसंसद चालू केली होती; मात्र आज ती समाप्त करत आहे. धर्मसंसदेमुळे कारागृहात गेलेल्या माझ्या सहकार्‍यांसाठी संघर्ष करण्यासाठी हिंदु समाजाने साथ दिली नाही. हिंदु समाजाच्या योध्यांची स्थिती वाईट होत आहे.