‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचा भावार्थ (भाग २)’ या ग्रंथाविषयी मनोगत

कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीच्या वास्तूला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १६ मे २०२२ या दिवशी ‘वास्तू वर्धापनदिना’च्या कार्यक्रमात प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशिला कसरेकर), पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि भक्त श्री. शशिकांत ठुसेकाका यांच्या हस्ते ‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचा भावार्थ (भाग २)’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखक कै. चंद्रकांत (दादा) दळवी हे असून त्यांच्या कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर या साहाय्यक लेखिका आहेत. या ग्रंथाविषयी प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेले मनोगत येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

कै. दादा दळवी यांच्याकडून प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनांचे भावार्थ लिहिण्याची घडलेली मोठी समष्टी सेवा !

‘मी मुंबईला रहात असतांना मध्ये मध्ये कै. चंद्रकांत रामकृष्ण दळवी (दादा दळवी) यांच्याकडे जात असे. तेव्हा ते नेहमी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या भजनांचे भावार्थ लिहिण्यात मग्न असत. मला वाटायचे, ‘यात वेळ घालवण्यापेक्षा ते नामजप का करत नाहीत ?’ आता माझ्या लक्षात आले की, नामजपाने त्यांची केवळ व्यष्टी साधना झाली असती. त्यांनी प.पू. बाबांच्या भजनांचे भावार्थ लिहिल्यामुळे भजनांच्या अभ्यासकांना भजनांचा खरा अर्थ समजण्यास आणि त्यामुळे त्यांची साधनेत प्रगती होण्यास साहाय्य होईल. भजनांचे भावार्थ लिहिण्याने दादा दळवी यांची समष्टी साधनाही झाली आणि त्या साधनेमुळे त्यांना साधनेच्या पुढच्या टप्प्याला लवकर जाता आले.

दादांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी प.पू. बाबांकडून भजनांचे भावार्थ केवळ समजूनच घेतले नाहीत, तर त्या भावार्थांच्या आशयामध्ये स्वतःच्या लिखाणाची भर घालून, ते सूत्रबद्ध करून, सुगम अन् ओघवत्या भाषेतही लिहिले. त्यांनी प.पू. बाबांच्या प्रत्येक भजनाचे केलेले विश्लेषण मला अतिशय आवडते. मला भजनांचा अर्थ आता खऱ्या अर्थाने कळायला लागला. याविषयी मी दादांप्रती कृतज्ञ आहे.

हे सर्व भजन-भावार्थ भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, गुरुकृपेसाठी करायची साधना इत्यादींविषयी अनमोल मार्गदर्शन करणारे आहेत. अशा प्रकारे ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि त्यांचे भावार्थ’ यांची ग्रंथमालिका सिद्ध झाली असून प्रस्तुत ग्रंथ हा या मालिकेतील दुसरा भाग आहे.

‘प.पू. बाबांच्या कृपेमुळेच आम्हा भक्तांकडून या ग्रंथाच्या प्रसिद्धीचे कार्य पूर्ण होऊ शकले’, याविषयी प.पू. बाबांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण करतो.’

– डॉ. जयंत बाळाजी आठवले, प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य (३.४.२०२२)

भावजागृतीसाठी ‘भजने आणि त्यांचे भावार्थ’ या ग्रंथमालिकेतील सर्व भागांचा लाभ घ्या !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बऱ्याच भजनांचे अर्थ अनेकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते. या दृष्टीने ही ग्रंथमालिका अतिशय उपयुक्त आहे.

  • भाग १ : ‘अ’पासून ‘क’पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार २७ भजने
  • भाग २ : ‘ग’पासून ‘ब’पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार ४३ भजने
  • भाग ३ : ‘भ’पासून ‘ज्ञ’पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार ४५ भजने