श्री महालक्ष्मी मंदिराचा समावेश केंद्रशासनाच्या प्रसाद योजनेत होण्याकरता राज्यशासनाने सकारात्मक पावले उचलावीत ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

श्री. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर – येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील ५१ शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. केंद्रशासनाच्या वतीने अशी मोठी मंदिरे आणि त्यांना भेट देणारे भाविक यांच्यासाठी प्रसाद योजना चालू करण्यात आली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिराचा समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य पर्यटन विभागास सादर करण्यात आला आहे. त्यासाठी आता राज्य पर्यटन विभागाची अनुमती आवश्यक आहे. या संदर्भात १५ मे या दिवशी केंद्रीय पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून या बैठकीत श्री महालक्ष्मी मंदिराचा समावेश केंद्रशासनाच्या प्रसाद योजनेत होण्यासाठी राज्यशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाकडून पुरेशा सेवा-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. ज्यात वाहनतळ, भक्तनिवास, दर्शन रांग व्यवस्था, अन्नछत्र यांशिवाय मंदिर सुरक्षिततेसाठी ‘बॅग स्कॅनर’ यांसह इतर संरक्षणविषयक गोष्टी इत्यादींची पूर्तता होणे आवश्यक आहे. केंद्रशासनाच्या प्रसाद योजनेत समावेश झाल्यास या योजनेच्या उद्दिष्टाप्रमाणे मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्था गतीमान होणार आहे.