बाबरी घेतली; मात्र ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही !  

असदुद्दीन ओवैसी यांची फुकाची धमकी

नवी देहली – मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, आमची एक बाबरी गमावली आहे. दुसरी मशीद कदापि गमावणार नाही. तुमच्या निष्क्रीयतेमुळे न्यायाची हत्या करून आमची मशीद ओरबडून घेण्यात आली; मात्र दुसरी मशीद ओरबडू देणार नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धमकी दिली. यापूर्वी ओवैसी यांनी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण राज्यघटनाविरोधी असल्याचे म्हटले होते. ‘बाबरी मशीद भाग २’ची सिद्धता केली जात आहे आणि त्यादृष्टीने हा पहिला प्रयत्न आहे, यामागे षडयंत्र आहे, असा आरोपीही त्यांनी केला होता.

देशातील धार्मिक स्थळांची स्थिती आहे तशीच ठेवावी ! – काँग्रेस नेते पी. चिदंबरम्

उदयपूर (राजस्थान) – देशभरातील धार्मिक स्थळांची स्थिती जशी आहे, तशीच ठेवली पाहिजे, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी येथे केले. पत्रकारांनी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी हे बोलत होते. (ज्ञानवापी मशीद पूर्वीचे श्री काशी विश्‍वानाथ मंदिर होते, तीच त्याची मूळ स्थिती आहे आणि तीच कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे यात कुणीही पालट करत नाही, तर सत्य उघड समोर आणले जात आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण चालू असून त्यातून जे सत्य आहे, तेच बाहेर येणार आहे. श्रीरामजन्मभूमीचेही असेच झाले होते आणि ते सर्वांना मान्य करावे लागले. तेच ज्ञानवापीविषयी होईल आणि ते मान्य करावे लागेल ! त्यामुळे ओवैसी यांच्या अशा धमक्यांना कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही !
  • यावरून ओवैसी यांनी ‘आम्ही कायदा पाळणार नाही’, असे एकप्रकारे स्पष्टच सांगितले आहे. हा न्यायालय आणि राज्यघटना यांचा अवमानच नव्हे का ?
  • ‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, म्हणजे नेमके काय करणार ?, हेही ओवैसी यांनी स्पष्ट करावे ! आता ‘ओवैसी यांचे विधान कायदा आणि सुव्यस्था बिघडवणारे आहे’, असे कुणी का म्हणत नाही ?