वाचा नवीन सदर : विदेशात प्रतिकूल स्थितीतही तळमळीने साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक
एस्.एस्,आर्.एफ्.च्या विदेशातील साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी
विदेशात साधना करतांना तेथील साधकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत. ‘त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते ?’, हे पुढे दिले आहे. यातून ‘भारतात साधना करण्यासाठी किती अनुकूल वातावरण आहे !’, हेही लक्षात येईल.
१. सात्त्विक पोशाख आणि केशरचना केल्यावर कार्यालयातील सहकाऱ्यांनी ‘आजीबाई’ म्हणून चिडवणे
माझ्या वयाच्या महिला तंग (अंगाला चिकटून असलेले) आणि भडक रंगाचे कपडे परिधान करतात. मी तसे न करता सात्त्विक रंगाचे आणि सैलसर कपडे परिधान करते, तसेच केसांचा अंबाडा घालते. हे सर्व पाहून कार्यालयातील माझे सहकारी, तसेच कुटुंबीय मला ‘आजीबाई’ म्हणून चिडवतात. मी सात्त्विक पोशाख परिधान केल्यावर मला लाभ होत असल्याने मी तसाच पोशाख घालत आहे. मी ‘चैतन्य मिळावे’, यासाठी कधी कधी भारतीय पोशाख (पंजाबी पोशाख) परिधान करते. तेव्हा लोक मला ‘भारतीय’ म्हणून चिडवतात किंवा माझ्याकडे विचित्र दृष्टीने पहातात; मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करते. याचे कारण ‘जीन्स, टी शर्ट’, या पाश्चात्त्य पोशाखांपेक्षा भारतीय पोशाख सात्त्विक असून मला त्यात चैतन्य जाणवते.
२. कपाळावर कुंकू लावून कार्यालयात गेल्यावर सहकाऱ्यांनी थट्टा करणे
मी कपाळावर कुंकू लावल्यावर मला चैतन्य मिळून माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण होत असल्याचे मला जाणवते. त्यामुळे मी घरी असतांना, तसेच कार्यालयात किंवा पेठेत (बाजारपेठेत) जातांना कपाळावर कुंकू लावते. मला याविषयी संमिश्र प्रतिक्रिया मिळतात. कुटुंबियांना हे विचित्र वाटते आणि माझा भाऊ, तसेच काही सहकारी याविषयी माझी थट्टा करतात; मात्र जेव्हा मी पेठेत खरेदीसाठी जाते, तेव्हा माझ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू पाहून हिंदु स्त्रियांना आनंद होतो. यातून लक्षात येते, ‘धर्माचरणाबद्दल समाजात पुष्कळ नकारात्मकता आहे; परंतु विदेशातील हिंदू कुंकवाचा वापरत करत नसले, तरी या संदर्भात त्यांच्या मनात श्रद्धा आहे.’
३. आध्यात्मिक संघटनांविषयी कुटुंबियांच्या मनात अविश्वास असणे
विदेशातील लोकांच्या मनात आध्यात्मिक संघटनांविषयी बराच अविश्वास आहे. येथे आध्यात्मिक गटांकडे (म्हणजे गुरु किंवा आश्रम यांकडे) ‘पंथ’ म्हणून पाहिले जाते. माझ्या कुटुंबियांतील लोकांना एका संघटनेविषयी ठाऊक आहे. कुटुंबियांनी भोंदू गुरूंच्या अयोग्य आणि असभ्य वर्तनाविषयी ऐकले आहे. ‘मी अशा एखाद्या संघटनेत जात आहे, जेथे माझे ‘ब्रेनवॉश’ (मूळ विचारांऐवजी नवीन विचार स्वीकारायला लावणारी दबावपद्धत) केले जाऊन माझ्याकडून पैसे उकळले जातील किंवा माझा अपलाभ घेतला जाईल’, असे त्यांना वाटते.
गेल्या १० वर्षांपासून मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे, तरीही माझ्या आईच्या मनात अजूनही संशय आहे की, ते कधीतरी माझे सर्व पैसे घेतील; मात्र ‘एस्.एस्.आर्.एफ्.कडून कोणतीही रक्कम घेतली जात नाही. ही एक स्वयंसेवी संघटना आहे’, हे मी आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ‘मी नोकरी सोडली असली, तरी माझ्याकडे पुरेशी रक्कम आहे. मी सर्व पैसे दिले असते, तर मला नोकरी सोडता आली नसती’, असेही मी तिला समजावण्याचा प्रयत्न करते. मी याकडे दुर्लक्ष करायला शिकले. मी तिला ‘मी देवाच्या कृपेने आनंदी आणि निरोगी आहे. देवच माझी काळजी घेतो’, असे सांगून आश्वस्तही करते.
– सौ. क्रिस्टन हार्डि (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कॅनडा
(वर्ष २०२०)
कुठे प्रतिकूल स्थितीत साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे विदेशातील साधक, तर कुठे अनुकूल परिस्थिती असूनही साधना न करणारे हिंदू !‘या लेखमालेच्या माध्यमातून विदेशांतील सामाजिक स्थिती, तेथील लोकांची विचारसरणी, ईश्वर आणि साधना या संदर्भातील तेथील लोकांच्या चुकीच्या संकल्पना लक्षात येतात. एकूणच तेथील वातावरण इतके रज-तमप्रधान आहे की, तेथे देवाचे नाव आठवणेही कठीण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीही एस्.एस्.आर्.एफ.चे साधक तिथे साधना करत आहेत, हे अतिशय कौतुकास्पद आहे. याउलट जगातील सर्वांत सात्त्विक वातावरण असणाऱ्या भारतामध्ये आणि तेही सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्मात जन्म मिळूनही भारतातील हिंदू साधनेसाठी अनुकूल परिस्थितीचा लाभ करून घेत नाहीत. ते धर्माचरण आणि साधना यांच्याकडे दुर्लक्ष करून पाश्चात्त्य संस्कृतीचा आंधळेपणाने अंगीकार करत आहेत. थोडक्यात अशा जन्महिंदूचा प्रवास अधोगतीकडे चालू आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.१.२०२१) |