काळानुसार अष्टांग साधनेच्या टप्प्यांच्या पालटलेल्या क्रमानुसार साधना करा !‘गुरुकृपायोनुसार साधना’ या अंतर्गत आतापर्यंत अष्टांग साधनेच्या टप्प्यांचा क्रम असा होता – १. स्वभावदोष-निर्मूलन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ७. सत्साठी त्याग आणि ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम) आता महाभयंकर आपत्काळ जवळ येत चालला आहे. अशा आपत्काळात केवळ देवच आपले रक्षण करू शकतो. ‘भाव तेथे देव’, या वचनानुसार आपल्यामध्ये भाव असेल, तर आपल्याला देवाचे साहाय्य लवकर मिळते. यासाठी स्वतःमध्ये भाव निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आता ‘भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न’ हा अष्टांग साधनेतील चौथा टप्पा (अंग) असेल. अष्टांग साधनेच्या टप्प्यांचा सुधारित क्रम असा आहे – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम) – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१२.४.२०२२) |
साधकामधील स्वभावदोष हे त्याच्या साधनेसाठी अडथळे असतात. त्याचबरोबर त्याचे काही गुण साधनेसाठी साहाय्यक ठरतात. त्यामुळे साधनेमध्ये स्वभावदोष-निर्मूलनाला जितके महत्त्व आहे, तितकेच गुण-संवर्धनालाही आहे. थोडक्यात साधनेसाठीचे हे दोन प्रयत्न म्हणजे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यासाठी ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेच्या आठ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचा उल्लेख केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ असा न करता ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा करावा.
साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही. सर्वसाधारणतः प्रत्येकालाच ताण येणे, काळजी करणे, निराशा, मनोराज्यात रमणे यांसारख्या स्वभावदोषांवर मात करावी लागते. त्यामुळे यांसारखे स्वभावदोष पुष्कळ असणाऱ्यांनी प्रामुख्याने स्वभावदोष-निर्मूलनावर भर द्यावा आणि यांसारखे स्वभावदोष अल्प असणाऱ्यांनी स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया राबवून गुण-संवर्धन प्रक्रियेवर भर द्यावा.
स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात पूर्वी दिलेल्या सूचनेनुसार प्रतिदिन स्वयंसूचनांची सत्रे आध्यात्मिक त्रास नसणाऱ्यांनी १२, मध्यम त्रास असणाऱ्यांनी १५ आणि तीव्र त्रास असणाऱ्या साधकांनी १८ करावीत.
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१२.४.२०२२)