मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

उजवीकडे जसवंतजी ठाकोर

मेहसाणा (गुजरात) – मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली. या प्रकरणी सदाजी ठाकोर, विष्णुजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत जसवंतजी ठाकोर यांचे भाऊ अजित यांनी पोलिसांना सांगितले, ‘जसवंत आणि मी आमच्या घराजवळील मेलाडी माता मंदिरात आरती करत होतो. आम्ही भोंग्यांवर ही आरती ऐकवत होतो. तेवढ्यात सदाजी आमच्याकडे आला आणि ‘तुम्ही भोंग्याचा आवाज एवढा मोठा का ठेवला आहे ?’, असे विचारले. ‘आम्ही आरती करत आहोत’, असे मी त्याला सांगितले. यावर रागावलेल्या सदाजीने शिवीगाळ करण्यास चालू केले आणि त्याच्या साथीदारांना बोलावले. त्यानंतर ५ जण काठ्या घेऊन आले आणि आम्हाला मारहाण केली.’