केडगाव (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

दीपप्रज्ज्वलन करतांना (डावीकडून) डॉ. नीलेश लोणकर, श्री. संदीप टेंगले, श्री. नागेश जोशी

पुणे, ४ मे (वार्ता.) – केडगाव येथील बाजार मैदानात १ मे या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने या सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. या सभेमध्ये समर्थ मंडळ पोलीस भरती केंद्राचे श्री. संदीप टेंगले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. सभेच्या प्रारंभी शंखनाद आणि दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर प्रा. प्रकाश देशमुख यांचा धर्मकार्यात असलेल्या कृतीशील सहभागाविषयी त्यांचा श्री. नागेश जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. केतन पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीची ओळख करून दिली. त्यानंतर वक्त्यांचे मार्गदर्शन झाले. हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा आणि श्लोक म्हणून सभेचा शेवट झाला.

प्रा. प्रकाश देशमुख (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. नागेश जोशी

या वेळी मार्गदर्शन करतांना श्री. संदीप टेंगले म्हणाले, ‘‘भारताचा गौरवशाली इतिहास आहे. भागवतामध्ये उल्लेख असलेल्या अनेक सूत्रांवरून आपल्याला लक्षात येते की, त्या वेळी असलेले विज्ञान हे आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते. संत ज्ञानेश्वर अतिशय लहान वयात अणू, परमाणू यांविषयी लिहितात. यातूनच संतांची महानता आणि त्यांची प्रगल्भता दिसून येते. धर्माचरणामुळे आपली प्रत्येक कृती सात्त्विक होते. सर्वांनीच आपल्या संस्कृतीचा अभ्यास आणि धर्माचरण करणे आजपासूनच चालू करूया.’’
श्री. नागेश जोशी म्हणाले, ‘‘हिंदु म्हणून एकत्र येण्याची हीच वेळ आहे. हिंदु धर्मावर होत असलेले आघात पहाता आज बहुसंख्यांक असलेले हिंदू उद्या अल्पसंख्यांक होतील कि काय, अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आपल्यालाही संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी आज आपण कटिबद्ध होऊन ‘दिवसातून किमान काही घंटे हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी देणार’, असा निर्धार करूया.’’

क्षणचित्रे 

१. सभास्थळी अनेक धर्मप्रेमी महिला पुष्कळ अंतर प्रवास करून आल्या होत्या.
२. सभेसाठी आलेल्या काही धर्मप्रेमींनी स्वत:हून पुढाकार घेऊन सभेची पूर्वसिद्धता करण्याची सेवा केली.

केडगाव (पुणे) येथील सभेला उपस्थित धर्मप्रेमी

सभेला सहकार्य करणार्‍यांचे आभार !

या सभेचे आयोजन आणि संपूर्ण व्यवस्था यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे डॉ. नीलेश लोणकर यांनी पुढाकार घेतला. यासह केडगाव ग्रामपंचायतचे सरपंच अजित शेलार, समर्थ मंडळ पोलीस भरती केंद्राचे सर्व विद्यार्थी, विठ्ठल शेळके, महेश अवचट, माहिती सेवाभावी संस्था (महाराष्ट्र राज्य)चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश अवचट, सौ. संगिता लव्हे, राजू गायकवाड, रामचंद्र लव्हे, आकाश थोरात यांचे सभेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे हिंदु जनजागृती समितीने आभार व्यक्त केले आहेत.