मराठी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार २९ वे सैन्यदलप्रमुख !

अभियंता असलेले पहिले सैन्याधिकारी !

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

नवी देहली – सलग दुसर्‍यांदा भारतीय सैन्यदलाचे प्रमुख असण्याचा मान महाराष्ट्रातील अधिकार्‍याला मिळणार आहे. सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचा ३० एप्रिल या दिवशी २८ मासांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. १ मे या दिवशी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे सैन्यदलप्रमुखाचा पदभार स्वीकारतील. या पदावर पोचणारे ते पहिले अभियंता अधिकारी असणार, हे विशेष !

१. ‘नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी’चे पदवीधर असलेले मनोज पांडे वर्ष १९८२ मध्ये ‘कॉर्प्स ऑफ इंजिनीयर्स’मध्ये नियुक्त झाले.
२. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून आतंकवादविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता.
३. १ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सैन्याचे उपप्रमुख होण्यापूर्वी ते सैन्याच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. ही कमांड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचे रक्षण करण्यासाठी उत्तरदायी आहे. मनोज पांडे हे जून २०२० ते मे २०२१ पर्यंत अंदमान आणि निकोबार कमांडचे ‘कमांडर-इन-चीफ’ होते.
४. याखेरीज लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी पश्‍चिम लडाखच्या उंच भागात पर्वतीय विभाग आणि ईशान्येकडील एका सैन्यदलाचे नेतृत्व केले.

ऑपरेशन ‘पराक्रम’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली !

डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘ऑपरेशन पराक्रम’चा भाग म्हणून पश्‍चिम सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि सैन्य तैनात करण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.