अमरावती येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक आणि हाणामारी !

दगडफेकीमध्ये १ पोलीस घायाळ, तर २३ आरोपींना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा लावण्याच्या कारणावरून २ गटांत वाद निर्माण होऊन हाणामारी आणि दगडफेक झाली. यामध्ये १ पोलीस कर्मचारी घायाळ झाला असून या प्रकरणी आतापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी १५० आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली. जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘हिंदू असो किंवा मुसलमान सर्वांनी आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात शांतता राखावी’, असे आवाहन केले आहे. (शांतता कुणाकडून भंग केली जाते, हे जगजाहीर असतांना हिंदूंनाही शांततेचे आवाहन का केले जाते ? उलट धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करणे आवश्यक ! – संपादक)

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला. सध्या घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरांत संचारबंदी लागू केली आहे.

भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या कह्यात !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. पोलिसांनी आतापर्यंत भाजपच्या २५ पदाधिकार्‍यांना कह्यात घेऊन आसेगाव पोलीस ठाणे येथे नेले आहे.