|
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – २३ आणि २४ जुलै २०२० या कालावधीमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींच्या चरणांवर ‘सिलिकॉन’चे लेप दिले होते; मात्र हा वज्रलेप अल्प कालावधीत निघण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील २ वर्षे देवाच्या चरणांचे दर्शन पूर्णपणे बंद होते. २ वर्षांनंतर २ एप्रिलला म्हणजे गुढीपाडव्याला जेव्हा पुन्हा देवाच्या चरणांच्या दर्शनास प्रारंभ करण्यात आला, तेव्हा हा प्रकार समोर आला. आतापर्यंत ४ वेळा पुरातत्व विभागाकडून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींवर विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले आहे.
१. रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण; म्हणजेच शाळीग्रामची असून ती अतिशय गुळगुळीत आहे; मात्र या मूर्तीच्या चरणांची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रत्येक वेळी रुक्मिणी मातेच्या चरणांवर वज्रलेप केला जातो. चरणांचे दर्शन चालू होऊन केवळ ८ दिवस झाले असून रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.
२. पुरातत्व विभागाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना वज्रलेप केल्यानंतर पुढील ७ ते ८ वर्षे तो लेप मूर्तींचे संरक्षण करेल, असे सांगण्यात आले होते; मात्र अल्पावधीतच वज्रलेप निघण्यास प्रारंभ झाल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मान्य केले. याविषयी त्वरित पुरातत्व विभागाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
(सौजन्य : News18 Lokmat)
मंदिरांतील मूर्तींचे कायमस्वरूपी रक्षण व्हावे, यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी ! – ह.भ.प. वीर महाराज
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींवर वारंवार लेप करूनही झीज होणे, हे पुरातत्व विभाग अन् मंदिर समिती यांसाठी लज्जास्पद आहे. काही ठिकाणी प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी श्री गणेशमूर्तीला रंगरंगोटी केली जाते, त्याप्रमाणे मंदिरातील मूर्तीला वज्रलेप करावा लागणे अयोग्य आहे. मंदिरातील देवतेच्या मूर्तीविषयी वारकर्यांच्या मनात श्रद्धा आणि जिव्हाळा आहे. त्यामुळे मूर्तींचे कायमस्वरूपी रक्षण व्हावे, यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी, तसेच या समितीने मंदिरातील मूर्तीविषयी सतर्क रहायला हवे. यासंदर्भात मंदिर समितीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.