नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
नागपूर, ११ एप्रिल (वार्ता.) – सध्या लव्ह जिहाद, डे-संस्कृती, पिझ्झा-बर्गर, पब-बार अशा परकीय आणि अंतर्गत षड्यंत्रांमुळे आपली युवा पिढी भरकटत आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जाज्वल्य इतिहासाची पुन्हा आठवण करून दिल्यास ते सन्मार्गावर येतील. त्यामुळे युवा पिढीचे परकीय आणि अंतर्गत षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गोविंदप्रभू नगरातील श्री हनुमान मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
सनातन संस्थेच्या श्रीमती सुषमा पराते उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाल्या, ‘‘आपण आनंदाच्या शोधात सर्वत्र भटकतो; पण तो मिळत नाही; कारण आपल्यामध्ये धर्माचरणाचा अभाव असतो. धर्माचरण केल्यानेच सर्वोच्च आनंदप्राप्ती होऊ शकते.’’
क्षणचित्रे
१. सभेला स्थानिक नगरसेवक भगवानजी मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२. सभास्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण आणि क्रांतिकारक यांची माहिती देणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते.
३. उपस्थित धर्मप्रेमींनी ‘आमच्या भागातही अशा सभा घेऊ शकतो’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.