हिंदु महासंघाकडून मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

४ सहस्र मुसलमानांसाठी हनुमान चालिसा लावण्यास विरोध केल्याचे प्रकरण

हिंदु महासंघाचे कार्यकर्ते 

पुणे – येथील कात्रज तलावाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदु महासंघाने मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात १० एप्रिल या दिवशी आंदोलन केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ‘मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाच्या दुपटीने हनुमान चालिसा लावावी’, असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. वसंत मोरे यांनी मात्र ‘मी माझ्या प्रभागात अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही’, अशी थेट भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आले होते. वसंत मोरे यांनी ‘प्रभागात ३ सहस्र ८०० मतदार मुसलमान असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून अडचण आहे’, असे कारण दिले होते. यासाठीच हिंदु महासंघाकडून आंदोलनाद्वारे त्यांचा निषेध करण्यात आला.

देशातील, राज्यातील आणि पुण्यातील हिंदूंना कुणी गृहीत धरत असेल, तर हिंदु महासंघ त्यांना उत्तर देईल ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

स्वतःच्या प्रभागातील ४ सहस्र लोकांच्या भावना दुखावल्या जातील; म्हणून ‘मी माझ्या प्रभागातील ५६ सहस्र लोकांच्या भावनेचा विचार करणार नाही’, अशी मानसिकता सध्या पुण्यात दिसत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जण जर प्रभागातील ४ सहस्र लोकांचा विचार करत असेल, तर मग ५६ सहस्र लोकांचा विचार कुणी करायचा ? त्या ५६ सहस्र लोकांना जागृत करण्याचे काम आम्ही करत आहोत. ‘हे’ ५६ सहस्र लोक काम पाहून मतदान करतात आणि ‘ते’ ४ सहस्र मात्र धर्म पाहून मतदान करतात. आपण आताच जागे न झाल्यास सर्वच लोकप्रतिनिधी असे वागतील आणि ५६ सहस्र लोक गृहीत धरले जातील. या देशातील, राज्यातील आणि पुण्यातील हिंदूंना कुणी गृहीत धरत असेल, तर हिंदु महासंघ त्यांना उत्तर देईल.